मुंबईतील ‘कोरोना’ रोखण्यासाठी फडणवीसांनी दिला मुख्यमंत्र्यांना ‘हा’ सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत, मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असताना ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के चाचण्या करण्यात आल्या. तीच संख्या राज्याच्या बाबत ४२ टक्के असून, मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे की, ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा दर १८.४४ टक्के होता. तर मुंबईचा संसर्ग दर १३.६३ टक्के आहे, असे असताना देखील चाचण्यांवर भर न देणे, जीवघेणे ठरू शकते. मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला पूर्वपदावर आणण्यासाठी अधिक चाचण्या करण्याची गरज असल्याचं, ते म्हणाले.

तसेच देशात महाराष्ट्र प्रतिदिनी प्रतिदशलक्ष सरासरी पेक्षा अधिक चाचण्या करणाऱ्या राज्यात मागे आहे. यामध्ये गोव्यात (१५८४), आंध्र (१३९१), दिल्ली (९५०), तामिळनाडू (८४७), आसाम (७४८), कर्नाटक (७४०), बिहार (६५०), तेलंगाणा (६३७), उत्तराखंड (५९०), हरयाणा (५६३) सरासरी प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करण्यात येतात. तर कोरोना संसर्ग कमी असणाऱ्या राज्यात सुद्धा महाराष्ट्र कोठेही दिसत नाही. राजस्थान (४.१८ टक्के), उत्तरप्रदेश (४.५६ टक्के), पंजाब (४.६९ टक्के), मध्यप्रदेश (४.७४ टक्के), गुजरात (५.०१ टक्के), बिहार (५.४४ टक्के), हरयाणा (५.५१ टक्के), ओडिशा (५.७१ टक्के), झारखंड (६.१९ टक्के), गोवा (८.०५ टक्के), तामिळनाडू (८.१० टक्के), देशाचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा सर्वाधिक कोरोना संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे.

पुढे फडणवीस पत्रात म्हणाले की, साताऱ्यात खाटांची क्षमता अधिक वाढवणे, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील संसर्ग तसेच मृत्युदरावर नियंत्रण मिळवणे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करुन देणे, अशा सूचना पत्रात नमूद करण्यात आल्या आहेत.

राज्यात ४२ लाखांच्यावरती चाचण्या करण्यात आल्या

राज्यात बुधवारी १५७६५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर जावून पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ५ लाख ८४ हजार ५३७ रुग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८९ हजार ५२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच मंगळवारी ३२० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत राज्यात ४२ लाख ११ हजार ७५२ जणांच्या चाचण्या केल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के अहवाल सकारात्मक तर बाकीचे नकारात्मक आले आहेत. तसेच राज्याचा मृत्यूदर वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.