शेतकरी आंदोलनाचा ‘फोकस’ गाजीपूर बॉर्डरवर केंद्रीत ! मोठ्या प्रमाणावर शेतकरी परतु लागले घरी, पोलिसांकडून लवकर कारवाईची शक्यता

नवी दिल्ली : कृषि कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ६२ दिवसांपासून आंदोलनाचा प्रमुख फोकस हा सिंघु बॉर्डर होता तो आता किसान नेता राकेश टिकैत यांच्यामुळे गाजीपूर बाँर्डरवर केंद्रीत झाला आहे. २६ जानेवारी रोजी आंदोलक लाल किल्ल्यावर धडकल्याने आंदोलकांपासून सामान्यांपर्यंत बहुसंख्य लोक नाराज झाले. त्यात पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे शेतकरी आंदोलक आता घरी परत जाऊ लागले आहे.

शुक्रवारी सकाळपासून पोलिसांनी गाजीपूर येथील बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. त्याचबरोबर गाजीपूर सीमा बंद केली आहे. येथील वाहतूक अन्य रस्त्यांवर वळविण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभरात पोलीस हे आंदोलन बळाचा वापर करुन आंदोलकांना हुसकावून लावण्याची शक्यता दिसून येत आहे. आज सकाळीही येथे आंदोलक आंदोलनावर ठाम असून ते जय जवान, जय किसान, इन्क्लाब झिंदाबाद अशा घोषणा देत आहेत.

 

 

 

 

 

२६ जानेवारीच्या हिंसाचारानंतर आता सरकारने हे आंदोलन मोडून काढण्याचे ठरविले आहे. पोलिसांनी आंदोलकांना जागेवरुन हटण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. या आंदोलनाच्या ठिकाणावर पुरविण्यात आलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. वीज पुरवठा बंद झाला आहे. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटही काढून घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सिंघु बॉर्डरवरील आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

गाजीपूर बॉर्डरवर किसान नेते राकेश टिकैत व त्यांचे सहकारी अजूनही आंदोलन करीत आहेत. गाजीपूरहून दिल्लीत शिरलेल्या आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन तेथे आंदोलन केले होते. त्यामुळे टिकैत यांच्यासह प्रमुख नेत्यांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या होत्या. त्यात त्यांना जागा खाली करण्याची नोटीस पाठविली गेली आहे. पोलिसांचा कारवाईचा अंदाज येऊ लागल्याने असंख्य शेतकर्‍यांनी भितीने घराचा रस्ता पकडला आहे. ट्रॅक्टर घेऊन आलेले शेतकरी ट्रॅक्टरसह पुन्हा परतल्याने राकेश टिकैत यांना काल रात्री रडु कोसळले.

पोलीस ही जागा रात्रीत जबरदस्तीने खाली करुन घेणार अशी शक्यता व्यक्त केली गेली होती. मात्र, पोलिसांनी रात्री कोणतीही हालचाल केली नाही. आता दिवसभरात राकेश टिकैत यांना अटक करुन हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता दिसत आहे.