पाथर्डीत तहसिल कार्यालय जाळण्याचा आंदोलकांचा प्रयत्न ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील शेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या मागणीसाठी शहरात बंद पाळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी शासकीय अधिकारी हज़र नसल्याने मोर्चात सहभागी असलेले येळीचे सरपंच संजय बडे रॉकेलची बाटली घेऊन तहसील कार्यालयाकडे धावले. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी पोलिस, महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेचे अधिकारी यांची बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन जवळे यांनी मोर्चेकऱ्यांना दिले. शहरात आदिवासी समाजाच्या महिलांनी शेवगाव रस्त्यावर पाल ठोकून अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे शहरातील व्यावसायिक, व्यापारी व मालमत्ताधारक यांनी मोर्चात सहभाग नोंदविला. नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अशोक गर्जे, सोमनाथ खेडकर, नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, प्रसाद आव्हाड, रमेश गोरे, मंगल कोकाटे, अमोल गर्जे, अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, सुभाष घोरपडे, दिनकर पालवे, रवी पाथरकर, गोकुळ दौंड, प्रतीक खेडकर, संजय बडे, सुनील ओव्हळ यांच्यासह शहरातील नागरिक व महिलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली.

स्व. वसंतराव नाईक पुतळयापासून मोर्चेकरी तहसील कार्यालयावर गेले. तेथे मोर्चाचे रुपातंर सभेत झाले. बहुतेक वक्त्यांनी शहरातील अतिक्रमण करणाऱ्यामुळे गावाचं गावपण संपत चाललं आहे. सकाळी शेवगाव रस्त्याला व्यायामासाठी चालत जाणारे नागरिक व महिला या भीतीमुळे जाण्यास बंद झाल्या आहेत. शहरात मालमत्ता व नागरिकांचे रक्षण करण्याबाबत पोलिस चालढकल करत आहेत.

अतिक्रमण करणाऱ्या महिलांना पोलिसांनी पकडून आणले व नंतर लगेच सोडून दिले. त्यांना मदत करणारे व पाठीशी घालणारे कोण आहेत, हे शोधून त्यांच्यावर कारवाई करावी. मोक्का नियमाने संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली. येळीचे सरपंच संजय बडे यांनी तहसील कार्यालयाकडे रॉकेलची बाटली घेऊन धाव घेतली.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक मंदार जवळे यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. सायंकाळी पोलिस, महसूल, बांधकाम विभाग व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिक्रमणांबाबत ठोस निर्णय घेऊ, असे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेतले.