आग्रा येथील म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज नाव योग्यच : कर्नल पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशमधील (आग्रा) येथे म्युझियमचे 2015-16 साली काम सुरू करण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या म्युझियमला मुघल म्युझियम नाव दिले होते. मात्र, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आता मुघल म्युझियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असे केले आहे. या निर्णयाला महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडने पाठिंबा दर्शविला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्राचे अध्यक्ष फिरोज मुल्ला, प्रदेश उपाध्यक्ष निवृत्त कर्नल लक्ष्मण साठे उपस्थित होते. निवृत्त कर्नल पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज कोणा जाती-धर्माचे द्वेष्टे नव्हते. छत्रपतींची लढाई अन्याय-अत्याचाराविरुद्ध होती. त्यामुळेच त्यांच्या राजनैतिकतेचा अवलंब जगभरामध्ये केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आग्रा येथील म्युझियमला देणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता टिकविणे, न्याय व्यवस्था टिकविणे असा एक आदर्श जनतेसमोर राहत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, साठे म्हणाले की, समाजामध्ये चांगले काम करीत असताना विरोध हा ठरलेलाच असतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काही मौलवींनी विरोध केला आहे. त्या विरोधाला उत्तर प्रदेश सरकारने भीक घालू नये. भारत देशातील मुस्लीम समाज छत्रपती शिवरायांना मानणारा आहे. त्यांच्या नैतिकतेचा त्यांना आदार आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे होत असलेल्या म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज देऊन समाजामध्ये चांगला संदेश दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. फिरोज मुल्ला यांनी प्रास्ताविकामध्ये छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडची भूमिका स्पष्ट केली.