महिला डॉक्टरची ‘हत्या’, ‘खुनी’ निघाला सहकारी डॉक्टरच, जाणून घ्या प्रकरण

लखनऊ : वृत्तसंस्था – आग्राच्या सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या तरूणी डॉक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी आग्रा पोलिसांनी एका डॉक्टरला अटक केली आहे. असा आरोप आहे की, डॉक्टर विवेकने आपल्या महिला साथीदाराची हत्या केली आहे. पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

महत्वाचे म्हणजे आग्रापासून लांब असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमध्ये बुधवारी एका मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. संध्याकाळपर्यंत मृतदेहाची ओळख पटली, त्यानंतर त्या डॉक्टर योगिता गौतम असल्याचे समजले. मंगळवारपासूनच तिचा फोन लागत नव्हता.

घरातील लोक चिंताग्रस्त झाले होते. आग्राच्या पोलिस ठाण्यातही अहवाल दाखल करण्यात आला होता, पण त्यांची मुलगी या स्थितीत सापडेल हे त्यांना कुठे ठाऊक होते. योगिताचे कुटुंब दिल्लीचे आहे. मुलीचा फोन लागत नसल्यामुळे त्रस्त झाल्याने काल ते आग्रा येथे आले.

उरई जालोन मेडिकल कॉलेजचा वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक तिवारी सतत तिला त्रास देत होता आणि जिवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याचा तपास केला. त्यांनी योगिताचा मृतदेह जिथे सापडला त्या सभोवतालचे सीसीटीव्ही तपासले.

यानंतर डॉ.विवेक तिवारीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान योगिताचा पोस्टमॉर्टम अहवालही आला, त्यानुसार तिच्या डोक्यावर आणि गळ्यावर जखम आहे. या अहवालात असेही समोर आले आहे की, मरण्यापूर्वी तिने आपला जीव वाचवण्यासाठी धडपडही केली होती.