5000 हजाराची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यास ठिबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेणाऱ्य़ा धर्माबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यावेक्षकाला नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.9) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली. दीपक शंकरराव हनवते – कोळेकर (वय-57 रा. रायगड नगर, एमजीएम कॉलेजच्या बाजूला, नांदेड) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या विरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्माबाद येथील शेतकरी यांनी आपल्या शेतात ठिबक संच मिळावा म्हणून तालुका कृषी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. परंतु ठिबक संचावर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी लाचखोर कृषी पर्यवेक्षक दीपक हनवते याने पाच हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांनी 5 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली.

पडताळणीमध्ये हनवते यांनी शेतकऱ्याकडे पाच हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी रात्री सपळा रचण्यात आला. रात्री आठच्या सुमारास शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयाची लाच घेताना कृषी पर्यवेक्षक दीपक हनवते याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस.एल. नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.एल. नितनवरे, पोलिस अंमलदार किसन चिंचोरे, हनुमंत बोरकर, अमरजीतसिंग चौधरी आणि चालक मारुती सोनटक्के यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.