राष्ट्रवादीच्या मुलाखतीला दांडी मारणारे आमदार संग्राम जगताप बड्या भाजप नेत्याच्या घरी !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला दांडी मारणारे पक्षाचे आ. संग्राम जगताप हे आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या शहरातील ज्येष्ठ नेत्याच्या घरी गेले. विशेष म्हणजे यावेळी पक्षाचे इतर पदाधिकारी व नगरसेवकही त्या ठिकाणी आले होते. आ. संग्राम यांनी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांसोबत केलेली ही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सुरुवातीला शिवसेनेसोबत त्यांची चर्चा झाली. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते भाजप नेत्यांच्याही संपर्कात आहेत. पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची त्यांनी माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा ते शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांच्या घरी दाखल झाले. विशेष म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारणारे आ. जगताप हे भाजप नेत्याच्या घरी गेल्यानंतर पक्षाचे इतर पदाधिकारी व नगरसेवकांनीही तिथे धाव घेतली.

यावेळी नगरसेवक भैय्या गंधे, माजी नगरसेवक नरेंद्रजी कुलकर्णी, नगरसेवक संजयजी चोपडा, नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक गणेश भोसले आदी उपस्थित होते. त्यांनी जगताप यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

भेटीमागे राजकीय कारण नव्हते : आ. जगताप

याबाबत ‘पोलीसनामा’च्या प्रतिनिधीने आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू केलेला आहे. त्यामुळे मी नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे जरी असले, तरी ते शहरातील नागरिक व मतदार आहेत. म्हणून एक उमेदवार म्हणून मी त्यांच्या घरी प्रचाराला गेलो होतो. त्यामागे कुठलाही राजकीय कारण नाही.’

आरोग्यविषयक वृत्त