अहिल्यानगर: Ahilya Nagar Crime News | थोरल्या भावाशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून ६ तरुणांनी त्याच्या १९ वर्षीय लहान भावाचे अपहरण करीत लोखंडी रॉडने त्यास मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक वसंत सदाफळ (वय- १९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गणेश नगर (ता- राहता) याठिकाणी घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून आणत सिन्नर-शिर्डी महामार्गावर सामाजिक वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला तो फेकून दिला. सोमवारी (दि.१४) सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. (Murder Case)
अधिक माहितीनुसार, प्रतीक याचे शनिवारी (दि.१२) रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशनगर येथील निर्मळ हॉस्पीटल समोरून अपहरण करण्यात आले. त्याला संशयितांनी सिल्व्हर रंगाच्या कारच्या डिक्कीत टाकून लांबवर नेत लोखंडी रॉडने वार करत त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह कारच्या डिक्कीत टाकून सिन्नर तालुक्यातील मुसळगाव शिवारात वनीकरणात नालीच्या पायथ्याशी टाकून दिला.
सोमवारी या परिसरात शेळ्या चारणाऱ्यास सकाळीच ९ वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला हा मृतदेह दिसल्यानंतर त्याने मुसळगाव पोलिस पाटलांना या संदर्भात माहिती दिली. दरम्यान याप्रकरणी मयत प्रतीकचा भाऊ रितेश सदाफळ (वय-२२) याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात भावाचा खून झाल्याची फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीववरुन संशयित प्रशांत ऊर्फ बाबू जनार्दन जाधव (रा- शिर्डी), अक्षय पगारे (रा-शिर्डी), चंदू तहकीत (रा-सावळीविहीर ता. राहाता), ओमकार शैलेश रोहम (रा- राहाता), प्रवीण वाघमारे (रा- कालिकानगर, शिर्डी) व सोनू पवार (रा- सावळीविहीर ता- राहाता) या सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रितेश सदाफळ आणि संशयित आरोपी असलेल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होते. हे सहाही जण रितेशच्या मागावर होते. त्याचा लहान भाऊ प्रतीकचे अपहरण केल्यानंतर रितेश आपोआप जाळ्यात येईल, तिथेच त्याचा खून करायचा असा संशयितांचा ‘प्लॅन’ होता. मात्र, रितेश त्या प्लॅनमध्ये फसला नाही, परिणामी राग अनावर झाल्याने संशयितांनी प्रतीकचा खून केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.