6 पॅक अ‍ॅब्स असणारे बाहुबली अ‍ॅथलीट, ‘कोरोना’नं पोहोचवलं होतं मृत्यूच्या दारी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –  जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटल (अमेरिका) मध्ये व्हेंटिलेटरवर गेलेला पहिला कोविड -19 रुग्ण आता बरा होत आहे. सुपरफिट व्यावसायिक अ‍ॅथलीट अहमद अय्याद मार्चमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कोरोना विषाणूने त्यांचे आयुष्य कसे बदलले. जेव्हा अहमद अय्याद यांना शुद्ध आली तेव्हा ते कोठे आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. घशातून त्यांच्या शरीरात एक लांब नळी टाकण्यात आली होती. 97 किलो वजनदार एका भक्कम अ‍ॅथलीटचे स्नायू कमकुवत झाले होते. ही अवस्था इतकी नाजूक होती की ते स्वत:ला ओळखू देखील शकले नाहीत.

अय्याद यांनी मंगळवारी सीएनएनच्या हवाल्याने सांगितले की, ‘मला शुद्ध येताच मी माझ्या हात, पाय आणि स्नायूंना पाहिले. माझी अवस्था पाहून मला वेड लागल्यासारखे झाले. मी फक्त एवढाच विचार करत होतो की माझ्या हातापायांना काय झाले आहे.’ अय्याद म्हणाले की त्यांची प्रकृती इतकी खराब झाली होती की डॉक्टरांना त्यांना कोमाच्या अवस्थेत व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. त्यांचे शरीर अजूनही हळू-हळू बरे होत आहे. तथापि श्वास, फुफ्फुसे आणि हृदयाच्या संबंधित समस्यांना ते अजून सामोरे जात आहेत.

अय्याद यांना कसा झाला कोरोना?

तसे तर अय्याद स्वतः वॉशिंग्टनमध्ये एक रेस्टॉरंट आणि क्लब चालवितात. पण स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते नेहमी मॅरेथॉन, ऑब्सटेकल रेस, बास्केटबॉल आणि बॉक्सिंगसारख्या खेळाशी जोडलेले असतात. सुरुवातीला पायऱ्या चढताना त्यांना खूप थकवा जाणवत होता. यानंतर त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. तीव्र तापाने शरीराची संपूर्ण उर्जा नष्ट होत होती. आठवड्याच्या दरम्यान त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला.

अय्यादची प्रकृती खालावत असल्याचे पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना वैद्यकीय तपासणी करवून घेण्याचा सल्ला दिला. 15 मार्च रोजी अय्याद रूग्णालयात गेले असता डॉक्टरांनी त्यांना इन्फ्लूएन्झा आणि कोरोना विषाणूची लागण झाल्याचे सांगितले. अय्यादची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. डॉक्टरांनी त्यांना जॉन हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये पाठवले, जिथे त्यांना 25 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशा फिट अ‍ॅथलीटची कोरोना विषाणू अशी परिस्थिती करेल हे कोणालाही माहिती नव्हते.

जॉन हॉपकिन्स हॉस्पिटलमधील डॉक्टर नताली वेस्टने म्हटले की अय्याद एक तरूण आणि अतिशय तंदुरुस्त व्यक्ती आहे. अय्यादसारख्या सुपरफिट व्यक्तीची कोरोना विषाणू जर अशी परिस्थिती करू शकत असेल तर त्याला टाळणे किती अवघड आहे ते समजून घ्या. कोरोना विषाणूला गंभीरपणे घेत नाहीत अशा सर्व लोकांसाठी अहमद अय्यादचे प्रकरण हा एक मोठा धडा आहे. या साथीच्या काळात जे आपले हात स्वच्छ धूत नाहीत किंवा मुखवटा घालत नाहीत त्यांनी या गोष्टी शिकल्या पाहिजेत.