अवैध वाळू वाहतुक करणारे ४ डंपर आणि टेम्पोंवर एलसीबीची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ४ डंपर आणि एका टेम्पोवर अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून त्यांच्याकडून ४३ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर ट्रक व टेम्पोचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डंपरचालक योगळे बिरा माळी (वय. २६, रा. नांदगाव ता. जि. अहमदनगर), ज्ञानेश्वर शिवराम हातेकर (वय २४, रा. नांदगाव ता. जि. अहमदनगर), सुभाष रामू निकम (वय. २४, रा, शिंगवे नाईक, ता. जि. अहमदनगर) अशोक भगवंत काळे (वय ५८, रा. शिंगवे नाईक ता. जि. अहमनदनगर) अशी डंपरचालकांची नावे आहेत. तर रवि संजय बर्डे (वय, २१, रा. देवसंडी ता. राहूरी जि. अहमदनगर) असे टेम्पोचालकाचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नगर मनमाड रोडवर नांदगाव येथून ३ ते ४ डंपर एकापाठोपाठ येत असून त्यातून वाळूची चोरून वाहतुक केली जात आहे. त्यानुसार त्यांनी लागलीच पथकातील कर्मचाऱ्यांना घेऊन तेथे सापळा लावला. त्यानंतर तेथून जाणाऱ्या चार डंपरसह एकूण १६ ब्रास वाळू असा ३८ लाख ६०९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर चालकांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

तर पाथर्डी रोडवरून एक टेम्पो वाळू वाहतुक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरही सापळा लावून पोलिसांनी टेम्पो बुन्हानपुर फाटा य़ेथे अडवून कारवाई केली. त्यावेळी टेम्पो व त्यातील २ ब्रास वाळू असा ५ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक इशू सिंधू, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, कर्मचारी रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष लोंढे, राहूल सोळुंके, रणजित जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, रोहित मिसाळ, संदिप चव्हाण, संभाजी कोतकर यांच्या पथकाने केली.