अहमदनगर पोलिसांच्या ‘आॅल आऊट’ मोहिमेत वॉरंटमधील १९०० आरोपी गजाआड

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाईन

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी आॅलआऊट मोहीम राबवत अनेक गुन्हेगारांना गजाआड केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने वाॅरंटमधील 1900 आरोपींना अटक करण्यात आली असून, आत्तापर्यंत फरार असलेल्या 387 जणांना ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये (दिनांक 29) एप्रिलपासून ‘आॅल आऊट’ ही विशेष मोहिम राबवण्यात आली होती. सदर मोहिमेमध्ये 1 जून पर्यंतच्या कारवाईचा आढावा घेण्यात आला.

सर्वात महत्वाचे म्हणजे या कारवाई दरम्यान फरार असलेल्या 387 आरोपींना अटक करण्यात आलं आहे. तसेच वारंटमधील 1 हजार 900 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. याशिवाय 74 कारवाया आर्म अॅक्ट कायद्याखाली करण्यात आल्या आहेत. विविध गुन्ह्यांत 16 पिस्तूलांसह 23 जीवंत काडतूसे, 34 तलवारी, 36 चाकू, देखील जप्त करण्यात आली आहेत. जुगार अॅक्टनुसार 69 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर जवळपास 3500 समन्सची बजावणी करण्यात आली असून, गंभीर प्रकारचे दरोडे टाकणाऱ्या तब्बल 15 टोळ्या जेरबंद केल्या आहेत. यावरुन अहमदनगर पोलिसांनी राबवलेल्या आॅलआऊट मोहिमेला चांगलंच यश आल्याचं मानलं जात आहे.