कोविड रुग्णालयातील आगी प्रकरणी न्यायालयीन चौकशी होणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अहमदाबाद येथील खासगी श्रेय रुग्णालयात घडलेल्या अग्नि तांडवाप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत. मागील आठवड्यात या रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे येथे आयसीयूत उपचार घेत असलेल्या 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश या न्यायालयीन चौकशीचे नेतृत्व करणार आहेत.

रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणामध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली होती. त्यानंतर अवघ्या तीन मिनीटांत ती संपूर्ण आयसीयू कक्षात पसरली असल्याचे चौकशीत त्यांना आढळून आले. याशिवाय त्यांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज देखील हस्तगत आहे. गृह राज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा म्हणाले, श्रेय रुग्णालयात 6 ऑगस्ट रोजी घडलेली आगीची घटना मुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीरपणे घेतली आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी त्यांनी 4 लाख रुपये तर जखमी झालेल्यांसाठी 50 हजार रुपायांची मदत जाहीर केली आहे.

याशिवाय त्यांनी एसीएस गृह आणि एसीएस शहर विकासला देखील चौकशीचे आदेश दिले असून तीन दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. चौकशी दरम्यान दोन वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांनी एएमसी, एफएसएल, विद्युत निरीक्षक, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून तपशील मागवला होता. या दोन्ही अधिकार्‍यांनी अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.