मॅट्रिमोनियल साइटवर Google चा HR मॅनेजर असल्याचं सांगितलं, 50 पेक्षा जास्त मुलींचे केले शारीरीक शोषण

अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबाद सायबर क्राइम ब्रँचने एका अशा सराईत भामट्याला अटक केली आहे, ज्याने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त मुलींची आर्थिक फसवणूक केली आणि अनेक मुलींचे शारीरीक शोषण सुद्धा केले. पोलिसांचे म्हणणे आहे की हा भामटा स्वत:ला इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अहमदाबादचा पास आऊट असल्याचे सांगत होता. त्याने मॅट्रिमोनियल साइट्सवर वेगवेगळ्या नावाने आयडी बनवून ठेवले होते आणि गुगलचा एचआर मॅनेजर असल्याचे सांगून मोठ्या घरातील मुलींना फसवत होता.

जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात आला तेव्हा समजले की, या व्यक्तीने वेगवेगळ्या नावाने स्वत:ला मॅट्रीमोनियल वेबसाइटवर गुगलचा एचआर मॅनेजर म्हणून रजिस्टर केले होते. इतकेच नव्हे, त्याने प्रत्येक वेबसाइटवर स्वत:चा पगार वार्षिक 4000000 नोंदवला होता. याशिवाय त्याने आयआयएम अहमदाबादमधून एमबीए झाल्याचा दावा सुद्धा केला होता आणि तशी बनावट डिग्री सुद्धा बनवली होती.

मुलींना विश्वासात घेऊन आरोपी त्यांच्याशी शारीरीक संबंध बनवून पैसे लुटून गायब होत होता. आरोप आहे की त्याने 50 पेक्षा जास्त मुलींना फसवले आहे. एका तरूणीच्या तक्रारीनंतर अहमदाबाद पोलिसांच्या सायबर सेलने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्याचे खरे नाव संदीप शंभुनाथ मिश्रा आहे. त्याने मॅट्रिमोनियल साइट्सवर विहान शर्मा, प्रतीक शर्मा, आकाश शर्मा यासारख्या अनेक नावांनी आपली प्रोफाइल बनवून ठेवली होती.

आरोपी हाय प्रोफाइल तरूणींच्या संपर्कात येत होता, नंतर आपल्या कुटुंबाचे आई, बहिण आणि वडीलांचे छायाचित्र दाखवून त्यांचा विश्वास जिंकत होता. पोलिसांनी त्याच्याकडून 30 पेक्षा जास्त सिम कार्ड, 4 फोन, फेक आयडी जप्त केले आहेत. हा व्यक्ती अहमदाबाद उज्जैन, ग्वाल्हेर, गोवा, छत्तीसगढसह अनेक राज्यातील मुलींना आपल्या जाळ्यात ओढत असे.

मागच्या वर्षी अहमदाबादची एक 28 वर्षांची तरूणी सुद्धा याच्या जाळ्यात अडकली, तिचे सुद्धा याने शारीरीक आणि आर्थिक शोषण केले होते. संदीपने अहमदाबादच्या तरूणीसोबत शारीरीक संबंध ठेवले आणि नंतर तिचे पैसे घेऊन गायब झाला. फसवणूक झालेल्या या तरूणीने अहमदाबाद पोलिसांशी संपर्क करून तक्रार नोंदवली. पोलीस नोव्हेंबर 2020 पासूनच आरोपीचा शोध घेत होते.