मोटेरो नाही तर आता नरेंद्र मोदी स्टेडियम ! आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे स्टेडियम बनले जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   गुजरातमधील अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा स्टेडियम आता नरेंद्र मोदी स्टेडियम नावाने ओळखले जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारत आणि इंगलंड दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी स्टेडियमच्या उदघाटन सोहळ्यात नव्या नावाची घोषणा केली. यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले कि, आम्ही येथे अश्या प्रकारे सुविधा बनविली आहे कि 6 महिन्यात ऑलिम्पिक, आशियाई आणि कॉमनवेल्थ सारख्या खेळांचे आयोजन करता येईल. मोटेरापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते.

शहा म्हणाले की, अहमदाबाद आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून ओळखले जाईल. नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून हे स्वप्न पाहिले होते, जे आता पूर्ण झाले आहे. नवीन स्टेडियम जगातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक तंत्रज्ञानाने सुसज्ज स्टेडियम म्हणून विकसित केले गेले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्‍या सामन्यापासून त्याची सुरुवात होणार आहे.

स्टेडियमचे वैशिष्ट्य :

या स्टेडियममधील प्रेक्षकांची एकूण क्षमता 1,32,000 आहे, परंतु कोरोना महामारीमुळे या सामन्यात 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. हे अहमदाबाद स्टेडियम 63 एकरांवर पसरलेले आहे. या स्टेडियमच्या बांधकामासाठी सुमारे 800 कोटी रुपये लागले आहेत. स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन प्रॅक्टिस ग्राउंड आहेत. एकाच वेळी चार ड्रेसिंग रूम असलेले हे जगातील पहिले स्टेडियम आहे. तसेच, या स्टेडियमवर पावसाचे पाणी काढण्यासाठी एक आधुनिक सिस्टीम बसविण्यात आली आहे. जरी सामन्यादरम्यान पाऊस पडला तरी अवघ्या अर्ध्या तासात खेळ पुन्हा सुरू होऊ शकतो. डे-नाईट सामन्यासाठी येथे एक विशेष एलईडी लाईटही बसविण्यात आला आहे. हे देशातील पहिले स्टेडियम आहे, जिथे सामना एलईडी लाईटमध्ये खेळला जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, हे ऑलिम्पिक आकाराच्या 32 फुटबॉल स्टेडियमच्या बरोबरीचे आहे. 2015 हे मैदान नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले होते. या बांधकामात ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट फर्म पोपुलस यांच्यासह अनेक तज्ञ गुंतले होते. यात लाल आणि काळी मातीपासून बनविलेले 11 पिच आहेत. हे जगातील एकमेव स्टेडियम आहे ज्याच्या मुख्य आणि सराव पिचवर समान माती आहे.