11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या अहमदाबाद येथे बुधवारी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ चे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शाह यांनी या स्टेडियमचे उदघाटन केले. या दरम्यान अमित शाह म्हणाले की, अहमदाबाद आता ‘स्पोर्ट्स सिटी’ म्हणून ओळखले जाईल, नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री म्हणून पाहिलेले स्वप्न आज पूर्ण झाले आहे. अमित शहा पुढे म्हणाले कि, सरदार पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव, नरेंद्र मोदी स्टेडियम आणि नारायणपुरा येथील क्रीडा संकुल या तिन्ही मिळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळल्या जाणाऱ्या सर्व खेळांना खेळण्याची पूर्ण व्यवस्था आता एकाच शहरात आणि एकाच ठिकाणी होईल. स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये जगातील सर्व खेळांची व्यवस्था येथे केली जाईल.

स्टेडियमच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले कि, या स्टेडियमची क्षमता 1.32 लाख आहे. ज्यामुळे हे केवळ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नाही तर जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम देखील आहे. येथे एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या खेळांचे आयोजन केले जाऊ शकते. गृहमंत्री पुढे म्हणाले कि, नरेंद्र मोदी स्टेडियम 63 एकरात पसरले आहे, ज्याला बनविण्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच मैदानात एकून 11 पिच तयार करण्यात आले आहे, ज्यात लाल आणि काळ्या मातीने बनवलेली वेगवेगळी पिच आहेत. एवढेच नव्हे तर खेळाडूंसाठी खास ड्रेसिंग रूमसुद्धा तयार केल्या गेल्या आहेत. चार ड्रेसिंग रूम असलेले हे पहिले स्टेडियम आहे. ज्यात जिमची देखील सुविधा आहे.

अमित शहा म्हणाले कि, स्टेडियममध्ये ना सावली दिसेल, ना पावसाचा कोणता परिणाम होईल. जवळपास 600 शाळा या स्टेडियमशी जोडण्यात येतील. सर्व शाळांतील मुलांना येथे आणले जाईल आणि खेळण्याची संधी दिली जाईल. तसेच स्टेडियमजवळ जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनविला जात आहे, त्या संपूर्ण भागात 20 स्टेडियम तयार केले जातील. ज्यात वेगवेगळ्या खेळांसाठी व्यवस्था केली जाईल. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हमध्ये ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा सुविधा असतील, हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम, नाटोरियम, अ‍ॅथलेटिक्स / ट्रॅक अँड फील्ड / फुटबॉल स्टेडियम, फील्ड हॉकी आणि टेनिस स्टेडियम, इनडोअर स्पोर्ट्स हॉल / अरेनास, वेल्डेड / स्केटिंग क्षेत्र, बीच व्हॉलीबॉल सुविधा, बोटिंग सेंटर असतील.