धक्कादायक ! रूग्णाच्या मनातील भीतीनं घेतला तरूण डॉक्टराचा बळी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गाबाबत प्रबोधन केले जात असताना सुद्धा नागरिकांच्या मनातून त्याची भीती जायचं काय नाव घेत नाही. त्यामुळे रुग्णाबरोबर डॉक्टरांचा जीव देखील धोक्यात आला आहे. असाच एक प्रकार नगरच्या खासगी रुग्णालयात घडला आहे. कोरोनाची लक्षणे आणि लागण झालेली संभाव्य असलेली माहिती लपवल्यामुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला आहे.

एका खासगी रुग्णालयात नोकरी करत असलेले डॉ. प्रशांत जगताप (वय २६) यांचा काल कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आलेल्या एका रुग्णावर त्यांनी प्राथमिक उपचार केले होते. तेव्हा रुग्णाला कोरोनाची सदृश्य लक्षणे आढळली होती. रुग्णाने केलेला प्रवास, इतरांशी आलेल्या संपर्क ही माहिती विचारुनही ‘नाही’ असे उत्तर देण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्या रुग्णाच्या कुटुंबातील दुसरा सदस्य आजरी असल्याने पुन्हा रुग्णालयात आला. त्याला देखील कोरोनाची लक्षणे दिसत होती. चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही त्याची लागण झाली. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण शेवटी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृत्यूमुळे नगरचे वैद्यकीय विश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले असून, त्यांची पत्नी गरोदर आहे. कोरोनाची अनाठायी भीती लोकांच्या मनात असताना वैद्यकीय सुविधांच्या गैरसोयीची त्यात भर पडत आहे. तसेच खाटा उपलब्ध नाही, उपचारासाठी जास्त खर्च येतो, कोव्हीड सेंटरमध्ये हाल होतात, अशा बातम्या येत असल्याने गंभीर लक्षणे असलेले रुग्ण माहिती लपवत असल्याचे दिसून आलं.