विधानसभा 2019 : नगर शहर मतदारसंघात आ. संग्राम जगताप Vs माजी आ. राठोड, दोघात चुरस ? युतीवर अनेक गणिते अवलंबून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन (सुशील थोरात) – अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात अनेकांचे लक्ष लागले आहे. आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे प्राथमिक चित्र आहे. मात्र युतीवरच पुढची अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत. वंचित बहुजन विकास आघाडी व ‘एमआयएम’कडूनही त्यांचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. नगर शहर मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी मुस्लिम मतांची संख्या निर्णायक असल्याने त्यावरही बरीच राजकीय गणिते अवलंबून आहेत.

मागील निवडणुकीत आमदार संग्राम जगताप हे अतिशय कमी फरकाने विजयी झाले. भाजपा-शिवसेना युती तुटल्याचा त्यांना फायदा झाला. भाजपचे उमेदवार अभय आगरकर यांनी प्रचार यंत्रणेच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळवली होती. नगरमध्ये हिंदुत्ववाद्यांची मोठी व्होट बँक आहे. ती शिवसेना व भाजपमध्ये विभागली गेली. त्याचा फायदा घेऊन संग्राम जगताप हे विजयी झाले. त्यांना मुस्लिम मतदारांचा मोठा फायदा झाला. नगर शहरात 55 ते 60 हजार मुस्लीम मतदार आहेत. ही मतेही निर्णायक आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याचे सांगत असले, तरी ते अनेक दिवसांपासून शिवसेनेकडून इच्छुक असल्याचे लपून राहिले नाही. मात्र शिवसेनेकडून त्यांना स्विकारले जात नसल्याने त्यांचे प्रयत्न असफल ठरतात की काय, असे वाटत आहे. मात्र युती तुटली, तर आ.संग्राम जगताप भाजपात प्रवेश करून विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असेही सांगितले जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीकडून माजी महापौर अभिषेक कळमकर व किरण काळे यांची नावे पुढे येऊ शकतात. युती कायम राहून अनिल राठोड उमेदवार राहिल्यास व राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांनी निवडणूक लढविण्यास संग्राम जगताप यांचे मोठी राजकीय नुकसान होणार आहे.

राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर व इतर नाराज कार्यकर्ते त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्या बाजूने मुस्लीम मतदार असले तरीही युतीच्या व्होट बँकेपुढे त्यांचा निभाव कितपत लागेल, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र युतीत जर बिघाड झाली. भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढली, तरच ही निवडणूक संग्राम जगताप यांना सोपी जाऊ शकते. आ. संग्राम जगताप हे भाजपकडून लढल्यास त्यांचे पारडे जड ठरू शकते. त्यामुळे माजी आमदार अनिल राठोड, आमदार संग्राम जगताप हे प्रमुख स्पर्धक मानले जात असले, तरी युतीवरच नगर शहर मतदारसंघाची राजकीय गणित अवलंबून आहे.

एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारासाठी घातक ठरू शकतात. शहरातील हिंदूत्ववादी विचारांची मोठी व्होट बँक असली, तरी मुस्लिम, माळी, पद्मसाळी, दलित मतदार निर्णायक स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत. केडगाव हत्याकांडापासून शहरातील राजकारण वैयक्तिक दुश्मनीवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत कसे पडतात, यावरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

मतदारसंघाची आतापर्यंतची परिस्थिती –
शहरातून सलग चार निवडणुकांमध्ये माजी आमदार अनिल राठोड यांनी विजय मिळवला होता. मागील निवडणुकीत युती फुटल्यामुळे मतविभागणीचा फायदा संग्राम जगताप यांना मिळाला. शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी स्वयंसेवक संघ व शिवसेना यांच्यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीची मोठी मते आहेत. त्यासोबतच मुस्लिम, माळी व इतर समाजाची मतेही निर्णायक ठरतात. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे असलेला हा मतदारसंघ गेल्या काही दशकांपासून युतीचा बालेकिल्ला बनला आहे. त्याला फक्त सन 2014 विधानसभा निवडणूक अपवाद ठरली.

Visit : policenama.com