केवळ भाजपामध्येच नव्हे तर देशाच्या राजकारणातही ‘हे’ पहिल्यांदाच घडलं, जाणून घ्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पाथर्डी तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरुन नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे जिल्हाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

पाथर्डी येथील भाजपा कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अ‍ॅड. दिनकर पालवे यांनी नोटीस पाठवली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस धाडण्यात आली आहे. १९ जुलै रोजी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मात्र, ही निवड पक्षाच्या घटनेच्या विरुद्ध असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. तसेच कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. नड्डा यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पाथर्डीचे मंडल अध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना सुद्धा नोटीस देण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांला बाजूला ठेवून विद्यमान आमदार यांच्या सांगण्यावरुन भाजपा पाथर्डी मंडळचे खोटे रेकॉर्ड तयार करुन ही घटनाविरोधी निवड करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी ही तालुका कार्यकारणी निवड रद्द करावी. नाहीतर न्यायालयात दाद मागणार असल्याचं नोटीस मध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच नोटीस चा पाच हजार रुपयांचा खर्च मंडळ अध्यक्ष माणिक खेडकर व आमदार मोनिका राजळे यांनी द्यावा, असे देखील यात म्हटलं आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात असून, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, या नोटीसला काय उत्तर मिळते, याकडे भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.

भाजपाचे शुद्धीकरण व्हावे- पाखरे

सुनील पाखरे म्हणाले, कार्यकारणीमध्ये विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा संघटनांमध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. मात्र, तालुका कार्यकारिणीमध्ये असे लोक आहेत ज्यांना जवळपास चार ते पाच संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे नुकसान होते. म्हणून सध्या भाजपाचे शुद्धीकरण होण्याची गरज आहे. तसेच तालुक्याचा कारभार आमदार निवास येथून न चालता पक्षाच्या कार्यालयातून चालला पाहिजे. या सर्व बाबी लक्षात आणून देण्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना नोटीस पाठवली आहे. जर पक्षानी याची दखल नाही घेतली तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे, पाखरे यांनी सांगितलं.