खळबळजनक ! गर्लफ्रेंडचं डोकं भिंतीवर आपटून तरुणाने स्वत:वर झाडली गोळी

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून मुलीच्या घरात घसून तिचे डोके भिंतीवर आपटून स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. विक्रम उर्फ विकी मुसमाडे (वय-26 रा. देवळाली प्रवरा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. विकीने आज सकाळी मुलीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिस्तूलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. विकीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत संबंधित तरुणी किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमचे त्याच गावातील एका मुलीवर प्रेम होते. ही मुलगी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. ती आजी आणि लहान बहिणीबरोबर राहते. आज पहाटे साडेपाच वाजता एका मित्राला घेऊन विकी तिच्या घरी गेला. त्याने संरक्षक भिंतीवरून तिच्या घरात गेला. यावेळी मुलगी स्वयंपाक घरात झाडलोट करत होती. विकी थेट स्वयंपाक घरात गेला आणि त्याने माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न कर, असे त्याने सांगितले. यावर मुलीन लग्नास नकार दिला.

यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. त्यावेळी संतापलेल्या विकीने मुलीचे डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे मुलगी जमीनीवर कोसळली. त्यानंतर त्याने कमरेचे पिस्तुल काढून स्वत:डोक्यात गोळी झाडली. जखमी अवस्थेत मुलीने तिच्या नातेवाईकांना फोन करुन घटनेची माहिती दिली. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुसमाडे याला त्याच्या मित्रांनी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेले. तसेच या घटनेत किरकोळ जखमी झालेल्या मुलीला राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे. घटनास्थळावर विकीने गोळीबार करण्यासाठी आणलेले पिस्तुल आढळून आले असून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजतेय.