सरकारकडून ‘कोरोना’चे पैसे मिळवून देतो असं सांगितलं, दागिने घेऊन पळाला ‘भामटा’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – एकाने सरकारकडून कोरोनाची मदत मिळवून देतो असे सांगून ज्येष्ठ महिलेचे दागिने पळविल्याची घटना अहमदनगरमधील नेवासा फाटा येथे काल सायंकाळी साडेचारच्या घडली आहे. याप्रकरणी काल रात्री उशीरा एका अज्ञात व्यक्तीविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केलाय.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सध्या सरकारकडून करोनाची मदत म्हणून सात हजार भेटतात. हे पैसे तुम्हालाहि मिळून देतो, असे सांगत एकाने ज्येष्ठ महिलेला तिचे आधारकार्ड झेरॉक्स काढायला पाठवले. याचवेळी त्याने तिच्या पिशवीतील दागिने घेऊन पसार झाला.

हमीदा दादा पठाण (वय ६५) ही ज्येष्ठ महिला नेवासा – शेवगाव या बसमध्ये बसली होती. यावेळी बसमधील एका २५ ते ३० वयोगटातील युवकाने त्यांना पिशवी उचलण्यासाठी मदत केली. तसेच त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. तसेच सरकारकडून आता करोनाची मदत म्हणून सात हजार रुपये मिळत आहेत, असेही सांगितले. त्यासाठी काही कागदपत्रांची गरज आहे, असे तो युवक म्हणाला. त्यानंतर हमीदा दादा पठाण ह्या या नेवासा फाटा येथे बसमधून उतरल्या असता संबंधित युवक देखील तिथे बसमधून उतरला. त्यावेळी हमीदा दादा पठाण ह्या आपल्या एका मैत्रिणीला घेऊन नेवासा फाटा येथे आल्या.

तेव्हा संबंधित युवकाने हमीदा दादा पठाण यांना त्यांच्याकडे असणाऱ्या आधारकार्डची झेरॉक्स काढून आणण्यासाठी पाठवले. झेरॉक्स काढायला जाताना त्याने दागिने पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर संबंधित महिलेने दागिने पिशवीत ठेवली आणि ती पिशवी तिच्या मैत्रिणीकडे दिली. संबंधित महिला झेरॉक्स काढण्यास निघून गेली. त्यावेळी संबंधित महिलेच्या मैत्रिणीला युवक म्हणाला, तुमच्या मैत्रिणीला झेरॉक्ससाठी पैसे पाहिजेत. त्यांची पिशवी द्या, त्यावर तिने दागिने असलेली पिशवी त्या युवकाला दिली. त्याचवेळी युवकाने पिशवीतील दागिने घेऊन पळ काढला.

आपली फसवणूक झाली आहे, असे असल्याचे लक्षात आल्यावर हमीदा पठाण यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.