तमाशाच्या फडात गोंधळ ; महिला कलावंतांचे कपडे फाडून बेदम मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथे यात्रेनिमित्त आयोजित तमाशाच्या तंबूत घुसून 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कलावंतांना बेदम मारहाण केली. तसेच महिलांचे कपडे फाडले. तमाशाच्या फडावर घातलेल्या गोंधळामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टाकळी लोणार ग्रामस्थांनी यात्रेनिमित्ताने हरिभाऊ बडे सह शिवकन्या बडे यांचा तमाशा आयोजित केला होता. तमाशा सुरू होण्यापूर्वी पाच ते सहा कार्यकर्ते तमाशा कलावंताच्या तंबूत घुसले. त्यांनी विनाकारण तमाशा कलावंताशी हुज्जत घातली. त्यानंतर शिवकन्या बडे त्यांच्या पाया पडल्या. तुमच्या गावात आम्ही पोट भरण्यासाठी आलो आहोत. आम्हाला त्रास देऊ नका असेही त्या म्हणाल्या. हल्लेखोरातील एकाने बडे यांना धमकी दिली. तुम्हाला आमचा झटका दाखवितो असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर अर्ध्या तासाने २०-२५ तरुणाचे टोळके तमाशा तंबूत घुसले. तमाशातील महिला व पुरुष कलावंताना बेदम मारहाण केली. काही कलावंत मुलींचा विनयभंगही त्यांनी केला. त्यांचे कपडे फाडले तसेच तंबूचे नुकसान केले.

या हल्ल्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस गावात आले. मात्र कसलीही चौकशी न करता निघून गेले. पोलिसांच्या या भूमिकेवरून संताप व्यक्त केला जात आहे.

श्रीगोंदा पोलिसांबद्दल नाराजी

मारहाणीच्या घटनेची दखल घेण्याऐवजी श्रीगोंदा पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तमाशा कलावंतांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेची पोलिसांनी तात्काळ दखल घेतली नाही. त्यामुळे श्रीगोंदा पोलीसांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. तक्रारीची दखल न घेण्याची श्रीगोंदा पोलिसांनी यापूर्वीची परंपरा कायम ठेवली आहे.