PM मोदींसोबतच्या बैठकीत ‘या’ जिल्हाधिकार्‍यांनी केलं बेधडक मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं ‘कौतुक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी सवांद साधला. या बैठकीला महाराष्ट्रातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना बोलण्यास संधी मिळाली. या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या विविध निर्णयांमुळे करोनाशी लढा देण्यात यश येत असल्याचं म्हणत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.

आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. या सवांदा दरम्यान अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी याबाबत माहिती पंतप्रधान मोदींना दिली. या माहितीवरून मोदींनी यावर समाधान व्यक्त केले. परंतु, विविध उपायाची माहिती सांगत असताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी त्याचे श्रेय मुख्यमंत्र्यांना देत मुख्यमंत्री ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती, तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच अन्य सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील करोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना या सर्वांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आलीय. तर या बैठकीनंतर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालकसचिव आशीषकुमार सिंह यांनीही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना फोन करून त्यांचे कौतुक केले.

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून केलेले प्रयत्न, खासगी डॉक्टरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना रुग्णांवर उपचार करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन या गोष्टी देखील डॉ. भोसले यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले आहे. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अहमदनगरहून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी सहभागी झाले होते.