शरद पवारांची ‘कोरोना’ चाचणी झाली, तब्येतीविषयी आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. सिल्व्हर ओक निवासस्थानातील सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसाह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे.

यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना कोणताही प्रॉब्लेम नाही. मी स्वत: खात्री केली आहे अशी माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी अहमदनगर येथे बोलताना दिली. कोरोनाची लागण झालेल्यांवर उपचार सुरु असून ते राहत असलेला परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्या देखील करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. शरद पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी ते चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत.

ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही टेस्ट करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात दौरा केला. त्यांच्यासोबत अनेक लोकांचा वावर होता. मात्र, निवासस्थानावरीलच काही व्यक्ती कोरोना बाधित झाल्यामुळे शरद पवार पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.