Nagar : शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर, रूग्णांना गरम दूध अन् अंडी मिळणार !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी स्वखर्चातून एक हजार बेड्चे कोव्हिड सेंटर उभे केले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या या कोव्हिड सेंटरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव दिलं आहे.

शिवसेनेत असलेल्या लंके यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय औटी यांचा त्यांनी पराभव केलेला. तसेच अलीकडे पारनेर नगर पंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याने लंके चर्चेत आलेले. आता शिवसेनेला शह देण्यासाठी भव्य कोव्हिड सेंटर उभारुन त्याला पवारांचे नाव दिल्याने लंके पुन्हा चर्चेत आले आहेत.

पारनेर तालुक्यातील कर्जुले या छोट्या गावात राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात लंके प्रतिष्ठानच्या वतीने हे केंद्र उभा करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील एक हजार कोरोना रुग्णांचे पालकत्व घेण्याची घोषणा देखील लंके यांनी केली आहे. तसेच पवारांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी गरम पाणी, दूध, अंडी, चहा, दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. रुग्णांच्या करमणुकीसाठी सोय करण्यात येणार आहे.

हे कोव्हिड सेंटर राज्यातील आदर्श सेंटर ठरणार असल्याने त्याला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. येथे दर्जेदार सुविधा आणि उपचार पद्धती देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं लंके म्हणाले. काही दिवसांपूर्वी लंके यांनी शिवसेनेतर्फे सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये त्रुटी सांगत त्यावरती टिका केली होती.