..म्हणून रोहित पवारांनी स्वतः हातात घेतली काठी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – करमाळा (Karmala) तालुक्यात धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला (Leopard) ठार मारण्याचा आदेश झाला असला तरी पोलिस आणि वन अधिकाऱ्यांना तो सापडत नाही. उलट बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हातात काठी घेऊन वन अधिकाऱ्यांसोबत काही वेळ शोध मोहिमेत (Search Operation) भाग घेतला. रात्रीही बिबट्या हाती लागला नसला तरी रोहित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या सीमा भागातील गावामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत त्या भागातील तीन जणांचे बळी गेले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहे. तर काहीजण थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे बिबट्याला ठार मारण्याचा आदेश वनविभागाने दिला आहे. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी बंदुका घेऊन फिरत आहेत. मात्र, बिबट्या अद्याप त्यांच्या हाती लागला नाही. अनेक वेळा तो गुंगारा देत पळून गेला आहे.

आमदार रोहित पवार कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा शेजारच्या तालुक्यात हल्ल्याची एक घटना ताजी असल्याने रोहित पवार यांनी तिथे धाव घेतली. कर्जत तालुक्यातील ग्रामस्थांसोबतच करमाळा तालुक्यातील ग्रामस्थांशीही संवाद साधत त्यांनी धीर दिला. रात्रीच्या गस्तीवरील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधून मोहिमेची माहिती जाणून घेतली. या कामात त्यांना प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून स्वत: रोहित पवार यांनी हातात काठी घेऊन वन विभागाच्या पथकाच्या गस्तीत सहभागी झाले. त्यांनी करमाळा तालुक्यातील वांगी, सांगवी येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बिबट्याला तातडीने पकडावे किंवा मारावे व आमची या संकटातून सुटका करावी अशी मागणी दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांनी रोहित पवार यांच्याकडे केली.