‘त्या’ शिवसेना उपनेत्यासह २ नगरसेविकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिकेच्या शहर अभियंत्यांवर बूट भिरकाविल्याच्या गुन्ह्यातील आरोपी शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड, नगरसेविका कमल सप्रे, रिटा भाकरे व माजी नगरसेवक दत्ता सप्रे या चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल दिल्याने राठोड समर्थक अटकेच्या भीतीने अस्वस्थ झाले आहेत.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामाचे निवेदन देण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात शिवसैनिकांचे शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी एका शिवसैनिकाने प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावून मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेवेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी चिथावणी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड व इतर सात जणांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने चार जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला, तर शिवसेना उपनेते अनिल राठोड, इतर दोन नगरसेविका व माजी नगरसेवकाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

राठोड यांचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळाल्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. या भीतीने त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. या प्रकरणात पोलिस प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.