खडसेंची नाराजी आणि भाजपमधील गटबाजीवर प्रथमच बोलले विनोद तावडे ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील भारतीय जनता पक्ष हा एकसंघ आहे. यात कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही असं मत माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरमध्ये शहर भाजपच्या वतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजपमधील अंतर्गत मतभेदांवरील चर्चेवर भाष्य करत ती चर्चा फेटाळून लावली आहे.

एकनाथ खडसे नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत तावडेंना विचारलं असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत असा मला ठाम विश्वास आहे” असं तावडे म्हणाले.

गेल्याच आठवड्यात एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीसांनी त्यांना त्रास दिला असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षानं अन्याय केल्यानं पक्षात राहू नये असा सूरही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता.

यानंतर खडसे शिवसेनेत जाणार की, राष्ट्रवादीत याबद्दल चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही खडसे पक्षात आले तर स्वागत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.