पवारांच्या पुस्तकातील ‘ते’ पान ; आ. रोहित पवारांनी भाजपला दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध केल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकातील एका पानावरील मजकूर व्हायरल करून त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होत आहे. याला आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सडतोड भाषेत उत्तर दिलं आहे. एका पानाची झेरॉक्स मारून शेतकरी समजणार नाही. त्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचावं लागेल. किंबहुना राजकीय हिताच्या पलीकडं जाऊन चिखल-माती तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर जावं लागेल. अशा शब्दात आमदार पवार यांनी सुनावलं आहे.

काही दिवसांपूर्वी कृषी विधेयक आणि राजकारण यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. अतुल भातखळकर म्हणाले होते की, “आत्मचरित्रात कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकाधिकार मोडून काढण्याचा जोरदार पुरस्कार करणारे शरद पवार आज राजकीय द्वेष आणि कोलांटी मारण्याच्या परंपरेनुसार मोदी सरकारच्या एकाधिकारशाही मोडून शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या कृषी विधेयकांना विरोध करत आहेत” असा टोाल त्यांनी पवारांना लगावला होता. या संदर्भात अतुल भातखळकर यांनी लोक लोक माझे सांगाती या शरद पवारांच्या राजकीय आत्मकथेतील उल्लेखाचा हवाला दिला होता.

भातखळकर यांची ही पोस्ट आणि पवारांच्या पुस्तकाचं पान व्हायरल झालं आहे. त्यावरून पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. या टीकेला रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहून उत्तर दिलं आहे.

रोहित पवार म्हणतात, “शेतकऱ्यांना निश्चितच बंधनमुक्त करावं ही सर्वांचीच भूमिका आहे. करार शेतीही झालीच पाहिजे. याबद्दलही कुणाचं दुमत नाही. परंतु सध्या केंद्र सरकारनं जे कृषी कायदे मंजूर केले त्यात असलेल्या त्रुटींना शेतकऱ्यांचा विरोध आहे. बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल की, नाही याबद्दल कायद्यात शब्दाचाही उल्लेख नाही. शेतकऱ्यांना बंधनमुक्त करण्यासोबतच बाजार समित्यांचं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे. परंतु केद्र सरकारनं मंजूर केलेले कायदे मात्र पद्धतशीरपणे बाजार समित्यांना संपुष्टात आणणारे आहेत. नव्या करार शेती कायद्यात शेतकऱ्यांना संरक्षण देण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. मुळात शेती सुधारणा विधेयकात असलेल्या त्रुटी भाजपला समजल्याच नाहीत. त्यासाठी त्यांना शेती आधी समजून घ्यावी लागेल. तरंच त्यांना शेतकऱ्यांचं हित समजेल.”

रोहित पवार पुढे म्हणतात, “राजकारण करण्यासाठी लोक माझे सांगाती च्या एका पानाची झेरॉक्स मारून शेतकरी समजणार नाही. त्यासाठी संपूर्ण पुस्तक वाचावं लागेल. किंबहुना राजकीय हिताच्या पलीकडे जाऊन चिखल माती तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यांचं सुखदु:ख समजून घ्यावं लागेल. तरंच शेतकरी आणि त्यांचं हित तुम्हाला समजेल. एका पुस्तकाच्या पानातून फक्त राजकारण करता येईल. आता सध्या फक्त तेच होताना दिसत आहे.”