अभिनेते शरद पोंक्षेंच्या गाडीची काच फोडली

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांच्या गाडीची काच अज्ञातांनी फोडल्याचं समोर आले. पोंक्षे यांच्यावरील रागातून हा प्रकार घडला तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु चोरीच्या उद्देशाने कुणीतरी हा प्रकार केला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीतून काहीही चोरीला गेलेले नाही.

1 ते 3 मे दरम्यान शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अहमदनगर येथे पार पडणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी शरद पोंक्षे व प्रसाद कांबळी हे नगरला आले होते. नगर-मनमाड महामार्गावर एका हॉटेलमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषद झाल्यानंतर जेव्हा ते निघण्यासाठी गाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे त्यांनी पाहिले. पोंक्षे यांनी मध्यंतरी केलेल्या काही वक्तव्यांचा निषेध म्हणून काच फोडली असल्याची चर्चा सुरु झाली होती.
car
या प्रकारानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे घटनास्थळी आले होते. पोलिसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले. त्यात तिघे व्यक्ती कारजवळ आल्याचे दिसत आहे. त्यातील एका व्यक्तीने ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाजाची काच फोडली. यावेळी इतर दोघे टेहाळणी करत होते, त्यानंतर तिघे ही तेथून निघून गेले. त्यांनी चोरीच्या उद्देशातून काच फोडल्याचे उघड झाले.

याच दरम्यान अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एका कार्यालयात आलेल्या महिलेच्या कारमधील पर्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पाहून पोंक्षे यांच्या गाडीची काच चोरट्यांनी फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कोणाही विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले.