चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे सोडा, ‘या’ मंत्र्याचा शेतकऱ्याला अजब सल्ला

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी चारा छावण्यांबाबत शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. ‘चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन सोडा’, असा अजब सल्ला मंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्याला दिल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनीही राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून सरकारची जबाबदारी झटकण्याची ही भाषा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी बुधवारी दुपारी १ वाजता पालकमंत्री पाथर्डी इथल्या विश्रामगृहावर बुधवारी आले होते, यावेळी हा प्रकार घडला. पालकमंत्र्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला असून शिंदे यांच्या वक्तव्यावर सगळीकडून नाराजी व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांबाबत संवेदनहीन राजकारणी –
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता.  यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमची जनावरं पाहुण्याकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला दिला
विशेष म्हणजे यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांनी तुमची जनावरं पाहुण्याकडे नेऊन सोडा, असं सांगताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.तांत्रिक अडचणी असल्या तरी पालकमंत्रांचा सल्ला संतापजनक असल्याची भावना आता व्यक्त होत आहे. तालुक्यातील जनता भयाण दुष्काळाच्या झळा सोसत असताना पालकमंत्री आणि नगरसेवक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विनोद करताना दिसून आले.
जबाबदारी ढकलण्याची  भाषा : शेतकरी नेते रघुनाथ पाटील
दरम्यान, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पाटील यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. अशी उत्तरे देणाऱ्यांना मंत्री म्हणावं की नाही हा प्रश्न पडतो. आमचे पाहुणे जम्मू-काश्मीर किंवा तामिळनाडूला राहत नाहीत. तेही या दुष्काळी भागातच राहतात. शिंदे यांना काय म्हणायचं आहे. स्वत:ची जबाबदारी ढकलण्याची ही भाषा आहे. यावर जास्त न बोलणंच ठीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.