1000 रुपयाची लाच घेताना पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी 1 हजार रुपयाची लाच घेताना श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयातील आरेखकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई आज (बुधवार) श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात सापळा रचून करण्यात आली. वसंत नानासाहेब सकट (वय-54 रा. पेडगाव, ता. श्रीगोंदा. जि. अहमदनगर) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरेखकाचे नाव आहे.

याप्रकरणी दौंड येथील 35 वर्षीय व्यक्तीने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या आजोबांच्या नावाने कर्जत तालुक्यातील खेड गावात जमीन आहे. ही जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याबाबतचा दाखला मिळण्यासाठी तक्रारदार यांनी श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयात अर्ज केला होता. जमीन लाभ क्षेत्राखाली येत नसल्याचा दाखला देण्यासाठी वसंत सकट याने तक्रारदार यांच्याकडे 1 हजार रुपयाची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अहमदनगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

तक्रारदार यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता सकट याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज श्रीगोंदा येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून एक हजार रुपयाची लाच घेताना वसंत सकट याला रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, अहमदनगर लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दिपक करांडे यांच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.