टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टँकर मंजुरीचे अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहेत. एखाद्या गावाकडून टँकरची मागणी आल्यास आवश्यकतेनुसार प्रस्तावाला तातडीने मंजुरी देण्यात यावी. तसेच संबंधित गावाला दोन दिवसांत टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘ऑडीओ ब्रीज सिस्टम’द्वारे अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यातील सुमारे सव्वाशे सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात तिन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.