तौसिफ शेख मृत्यू प्रकरण : ‘त्या’ प्रांताधिकारी, तहसीलदारांसह 9 जणाविरुध्द ठपका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – दावल मालिकेतील अतिक्रमण प्रकरणात आत्मदहन करणार्‍या तौसिफ शेख याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी, तहसीलदारांसह नऊ जणांविरुद्ध ठपका ठेवण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

चौकशी समितीने तत्कालीन प्रांताधिकारी, तहसिलदार, तौसिफचे पाच सहकारी, वॉचर व ट्रस्टी अशा नऊ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवला आहे. जिल्हाधिकारी व्दिवेदी यांनी हा अहवाल स्वीकारत, त्यानुसार नऊ जणांवर नियमानुसार कारवाई करा, असा आदेश महसूल व पोलीस यंत्रणेला दिला आहे.

कर्जत येथील दावल मलिक ट्रस्टच्या जागेत अनधिकृत बांधकामे झाली असून, ते तात्काळ हटविण्याची मागणी तौसिफ शेख याने वारंवार प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याच्या मागणीला केराची टोपली दाखवली जात होती. वारंवार निवेदने देऊनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने तौसिफ शेख याने 20 डिसेंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यात भाजून गंभीर जखमी झालेल्या तौसिफ शेख याचा उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.

शेख यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍या दिवशी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. त्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, नगरपालिका शाखेचे प्रभारी जिल्हा प्रशासन अधिकारी राजेंद्र थोटे यांचा समावेश होता. या समितीने देवस्थानचा ट्रस्टी जहांगीर शेख तसेच तत्कालीन तहसीलदार, प्रांताधिकारी, तौसिफचे पाच सहकारी, वॉचर पोलिस कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवला आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सोपविला आहे. त्या हवालानुसार संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.