‘एड्स’ची परिस्थिती आजही गंभीरच !

लातूर : पोलीसनामा आॅनलाइन – एचआयव्ही अर्थात एड्स या आजाराची २००३ मध्ये जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आजही आहे. फरक एवढाच झाला आहे की, त्यावेळी ज्यांना हा आजार होता, ते आता चाळीशीच्या पुढे गेले असून, त्यांची मुले विशीच्या वयात आहेत. त्यामुळे हा आजार तरुण व वयस्कर लोकांमध्ये आहे. औषधोपचारामुळे ते चांगल्या पद्धतीने जगत आहेत, अशी माहिती उगिले हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका डॉ. वंदना प्रदीप उगिले यांनी पत्रकार परिषदेत दिली. एचआयव्ही रुग्णांसाठी समर्पित देशातील पहिले हॉस्पिटल म्हणून डॉ. उगिले यांचे हॉस्पिटल ओळखले जाते.
डॉ. वंदना उगिले

डॉ. वंदना उगिले म्हणाल्या, एचआयव्ही आजाराबाबत पुन्हा जनजागृतीची गरज आहे. डॉ. प्रदीप उगिले यांनी ३० मार्च २००३ रोजी उगिले हॉस्पिटल केवळ एचआयव्ही रुग्णांसाठी देशात पहिल्यांदा सुरू केले. तेव्हापासून ते एप्रिल २०१७ पर्यंत या हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात ६७ हजार ५४४ रुग्णांची तपासणी झाली होती. पैकी ४ हजार ३६३ जणांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. त्या कालावधीत ४२७ जणांना मृत्यू झाला होता. त्यामध्ये ३३३ पुरुष व ९४ महिला होत्या. डॉ. प्रदीप उगिले यांच्या अकस्मात निधनानंतर या हॉस्पिटलची धुरा मी सांभाळत आहे. जुलै २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २ हजार ८२३ रुग्णांची तपासणी बाह्यरुग्ण विभागात झाली असून, २६० रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. त्यात १२४ जणांची एचआयव्ही तपासणी केली असता ५२ जणांना एचआयव्हीची  लागण झाल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती डॉ. उगिले यांनी दिली.

उगिले हॉस्पिटलतर्फे शाळा व महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ७ डिसेंबरपर्यंत उगिले हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर राजीव गांधी चौक, लातूर येथे हे निबंध पाठवायचे आहेत. प्रथम पारितोषिक २ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १ हजार ५०० रुपये, तृतीय पारितोषिक १ हजार रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

धक्कादायक… शॉक देऊन कुटुंबच संपविण्याचा भयंकर प्रकार