Coronavirus : ‘आवश्यकता असेल तरच या !’ AIIMS रुग्णालयाकडून रुग्णांच्या नियोजित भेटी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने रुग्णांच्या नियोजित भेटी रद्द केल्या असून आवश्यकता असेल तरच डॉक्टरांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात येण्याचे आवाहन रुग्णालय व्यवस्थापनाने केले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी वर्धमान महाविर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटलमधील सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाबाबत आढावा
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी कोरोनापासून बचाव करण्यासाठी उचललेल्या उपायांवर चर्चा केली. दरम्यानच्या काळात सरकारी कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी घेण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. गुरुवारी आणखी एक आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या आढावा बैठकीत मुख्यमंत्री व्यतिरिक्त दिल्ली सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली सरकारने उचलली महत्त्वाची पावले
दिल्लीत कोरोना रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत. कोरोना पासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी एक मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच हा आजार रोखण्यासाठी रुग्णालयात विलगीकरण वॉर्डची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये 50 हून अधिक लोकांनी उपस्थित राहू नये असे म्हटले आहे. दुसरीकडे मेट्रोने लाखो लोक प्रवास करत आहेत. त्यामुळे मेट्रो स्टेशन आणि मेट्रोचे डबे स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिल्ली सरकारने दिले आहेत.

पोलिसांकडून एनओसी आणि परवानगी नाही
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. यापुढे पुढील आदेश मिळेपर्यत एनओसी मिळणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच दिल्ली येथील नॅशनल जिओलॉजिकल पार्क देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर सीबीएसई बोर्डाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार प्रत्येक केंद्र अधीक्षकांनी दोन विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी एक मीटरचे अंतर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला आहे अशा विद्यार्थ्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.