दर महिन्याला २ रूपं, ‘कोरोना’ आणखी नवा अवतार घेणार; AIIMS च्या संचालकांनी केलं सावध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नुकताच कोरोना व्हायरस स्ट्रेन (Coronavirus Strain) हा कोरोनाचा नवा प्रकार ब्रिटनमध्ये (Britain) आढळला आहे. Covid-19 विरुद्ध जगभर सुरु असलेली लढाई या नव्या कोरोनामुळे आणखी अवघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनशी संपर्क सध्या तोडला आहे. कारण, हा विषाणू सध्या झपाट्याने पसरत आहे. यामुळे ब्रिटनमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी CNN-NEWS 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या नव्या व्हायरसचे परिणाम काय होऊ शकतात? याचा कसा सामना करायचा? कोरोना व्हॅक्सिन (Co vaccine) च्या निर्मितीची तयारी कशी सुरु आहे? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली आहेत. गुलेरिया हे Covid-19 चा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्सचे देखील सदस्य आहेत.

डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) सांगतात, आपल्या देशातील पेशंटची संख्या कमी झालेली आहे. सध्या उतरता ट्रेंड (Downward trend) सुरु असून आपला ‘रिकव्हरी रेट’ ही चांगला आहे. जगातील अनेक भागात सध्या जी परिस्थीती आहे, त्याचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा व्हायरस हा अधिक संसर्गजन्य असला तरी यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पेशंट्सची संख्या कमी आहे. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर (Physical distancing), मास्कचा नियमित वापर या सारख्या Covid-19 काळातील गाईडलाईन्सची अंमलबजावणी या जुन्याच गोष्टी नव्या परिस्थितीमध्येही अधिक जागरुकपणे करण्याची आवश्यकता आहे. भारतामध्ये हा विषाणू दाखल झाला तरी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत.

नव्या व्हायरची लागण झालेल्या पेशंट्सची संख्या मोठी आहे. मात्र यामुळे मृत्यू पावलेल्या किंवा हॉस्पिटलमध्ये गेलेल्या व्यक्तींची संख्या फार नाही, हे सध्या उपलब्ध असलेल्या डेटावरुन स्पष्ट होते. या व्हायरसचे व्हॅरिएंट (Variant) नाव न ठेवता स्ट्रेन असे नाव का देण्यात आले, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. या व्हायरसमध्ये अनेक म्यूटेशन्स (Mutations) आहेत. यामध्ये दर महिन्यालाला साधारण दोन म्यूटेशन्स आढळतात. म्हणून हे म्यूटेशन्स असे सुरूच राहणार आहेत. त्याचवेळी याची लक्षणं समान असून त्याच्यावरील उपचारपद्धती देखील सारखी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या डेटावरुन हे उपचार नव्या व्हायरसची लागण झालेल्या पेशंट्सवरही प्रभावी ठरत आहेत.

सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या व्हॅक्सिन निर्मितीच्या प्रक्रियेत मोठे बदल करण्याची गरज मला दिसत नाही. सध्याच्या ट्रेंडनुसार नव्या व्हायरसची लागण तरुणांना होण्याचे प्रमाण जास्त आहे. ही संख्या व्हायरसमुळे वाढली की ब्रिटनमधील फेस्टिव्हल सिझनचा यावर काही परिणाम झाला आहे ? याचे सखोल विश्लेषण करणे आवश्यक आहे. सध्याच्या फेस्टिव्हल सिझनमुळे मोठ्या प्रमाणात लोकं एकत्र जमत आहेत. त्यामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे उपलब्ध डेटाच्या सखोल अभ्यासानंतरच या व्हायरसचा मुलांवर आणि तरुणांवर अधिक परिणाम होतो का? या प्रश्नाचे उत्तर देता येईल.

कोरोनामुळे (Covid-19) होणारे मृत्यू थांबवणे ही सध्या आपली पहिली गरज आहे. त्यामुळे या आजाराचा सर्वात जास्त धोका असलेले ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी यांचे सर्वात पहिल्यांदा लशीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा विस्तार केला जाईल. ही मोहीम मोठ्याप्रमाणात राबवल्यानंतर कोरोनाची साखळी तोडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. त्यानंतर लशीकरण मोहीम आक्रमक पद्धतीनं राबवण्याची गरज उरणार नाही. अर्थात ही अवस्था येईपर्यंत जास्तीत जास्त व्यक्तींचे लशीकरण होणे आवश्यक आहे.

डॉ. गुलेरिया पुढे सांगतात, आगामी काळात कोरोना पेशंट्सचे प्रमाण किती असेल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे प्रमाण यापुढेही कमी झाले तर आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही. आपल्याकडे काही भागात कर्फ्यू लावण्यात आला आहे. तेथील परिस्थितीवर कोणते उपाय करता येऊ शकतात यावर विचार सुरु आहे. एखादा भाग ‘कन्टेंमेंट झोन’ जाहीर करुन त्या ठिकाणी अधिक व्यापक पद्धतीने टेस्टिंग करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे, असे मला वाटत नाही.

या स्ट्रेनचे भविष्यात काही नवे परिणाम समोर आले तर त्यावरील उपाय आणि औषध याचा अधिक नेमकेपणे विचार करता येईल. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सिनला सरकारकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लशीकरण कार्यक्रम काही टप्प्यांमध्ये राबवण्यात येईल. सुरुवातीच्या काळात कोव्हिड योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचवण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य गटामधील नागरिकांचे लशीकरण करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया राबवण्यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कोव्हिड काळातील उपाय काळजीपूर्वक राबवले तर कोणत्याही स्ट्रेनपासून आपण सुरक्षित राहू. त्याचबरोबर सध्या या विषयावर अगदी सुरुवातीची माहिती उपलब्ध आहे.