Coronavirus : ‘कोरोना’चा कोणाला सर्वाधिक धोका ? ‘एम्स’च्या संचालकांनी दिली 8 प्रश्नांची उत्तरं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि बर्‍याच देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे लोक चिंताग्रस्त आहेत, साधा खोकला आणि शिंक आल्याने देखील लोक कोरोनाची धास्ती घेत आहेत. भीती, तणाव आणि चिंताग्रस्ततेवर मात करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी खास संवाद साधला. कोरोना विषाणूबद्दल लोकांच्या मनात उद्भवणार्‍या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली आहेत.

प्रश्न: कोरोना विषाणू किती धोकादायक आहे, याची किती भीती बाळगली पाहिजे आणि कोणती खबरदारी घ्यावी?
उत्तर – नॉव्हेल कोरोना व्हायरस (COVID-19) हा एक नवीन विषाणू आहे, जो जगभरात वेगाने पसरत आहे, यावर अद्याप तरी कोणतेही औषध तयार झालेले नाही. तथापि, हा विषाणू थांबविण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे युरोप, चीन आणि अमेरिकेच्या तुलनेने कोरोना विषाणूची प्रकरणे भारतात कमी आहेत. त्यामुळे या विषाणूस घाबरून जाण्याची गरज नाही. चीनचा डेटा पाहिला तर 80 टक्के असे लोक आहेत ज्यांना कोरोना विषाणूची लागण किंवा सौम्य संसर्ग आहे. जे सामान्य औषधे घेतल्यामुळे बरे होतात.

 

प्रश्न- भारतातील कोरोनाची परिस्थिती कशी आहे?
उत्तर- हे समजणे आवश्यक आहे की हा इतका धोकादायक रोग नाही, परंतु जे वृद्ध आहेत, ज्यांना हृदयाची समस्या आहे, रक्तदाब, शुगर यासारखे आजार आहेत अशांना या काळात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. यासह आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. जर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली तर आरोग्य सुविधा पूर्णपणे तयार करणे आवश्यक आहे. जेणेकरून आपण या विषाणूमुळे पीडित लोकांना वाचवू शकू.

 

प्रश्न- कोरोना विषाणूमुळे बर्‍याच ठिकाणी भेट देण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशा परिस्थितीत काय करावे?
उत्तर – कोरोना विषाणूबद्दलच्या जागतिक आकडेवारीवर नजर टाकल्यास भीती बाळगणे साहजिक आहे. कारण युरोप, इटली आणि अमेरिकेत ही प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात भीती पसरणे हे सामान्य आहे, परंतु जर आपण भारताबद्दल बोललो तर येथे कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत, परंतु त्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जास्त घाबरण्याऐवजी अधिक सतर्क रहा.

तसेच आपण सर्वांनी काही ठरविलेल्या यात्रा पुढे ढकलल्या पाहिजेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा. आपले हात स्वच्छ धुवावे. हे सर्वात जास्त महत्वाचे आहे. जर आपल्याला खोकला आणि शिंका येत असतील तर रुमालाचा वापर करावा. तसेच ताप, सर्दी अशी लक्षणे आढळल्यास घरीच राहावे आणि बाहेर जाण्याचे टाळावे.

प्रश्न- सर्दी, खोकला होणे म्हणजे कोरोना व्हायरस होणे?
उत्तर – हे समजणे आवश्यक आहे की हवामान बदलत आहे, अशात ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे होऊ शकते. हे कोरोना विषाणूच्या लक्षणांच्या बरोबरच सामान्य आजाराची लक्षणे देखील आहेत. ज्याला असे लक्षणे आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये. आपल्या देशात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नाही, फ्लूची ही सामान्य लक्षणे आहेत, ज्यामध्ये कोरोना विषाणूची भीती बाळगण्याची काहीच गरज नाही.

प्रश्न – मास्क लावणे आवश्यक आहे की नाही?
उत्तर – मास्क दोन प्रकारचे असतात. पहिले सर्जिकल मास्क आणि दुसरे N95 मास्क. प्रत्येकास सर्जिकल मास्क लावण्याची आवश्यकता नाही. कोरोना विषाणूची भीती बाळगून प्रत्येकजण असा विचार करत असतो की जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मास्क लावावे. लोक घराच्या आत देखील मास्क लावत आहेत. परंतु कोणताही असा डेटा नाही जो असे सांगू शकेल की मास्क लावल्याने आपले रक्षण होईल आणि कोरोना विषाणूला पूर्णपणे टाळता येईल.

जर आपल्याला सर्दी, खोकला असेल तर आपण मास्क लावू शकता जेणेकरून शिंकताना आणि खोकताना संक्रमण पसरणार नाही. जेव्हा आपण बाजाराला जात असाल, तेव्हा आपण संसर्गाचा प्रसार होण्यापासून रोखू शकता. परंतु जर आपल्याला सर्दी आणि खोकला नसेल तर मास्क लावण्याची आवश्यकता नाही. तसेच रुग्णालयात काम करणाऱ्यांसाठी N95 चे मास्क आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांचा उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांना मास्क लावणे बंधनकारक आहे. कारण त्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.

प्रश्न- कोणत्या प्रकारचे अन्न सेवन केले पाहिजे?
उत्तर – चांगले अन्न ग्रहण केले पाहिजे. आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगल्या अन्नाचे सेवन करावे. ताजी फळे आणि भाज्या खाव्यात, परंतु रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणतेही विशेष औषध घेण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न- नॉनव्हेज खाल्ल्याने कोरोना विषाणू पसरतो का?
उत्तर – कोरोना विषाणू हा एक मानवी विषाणू आहे. हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत आला आहे. ज्यामुळे हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीवर ड्रॉपलेट्सने पसरत आहे. जर एखाद्यास खोकला असेल तर हा विषाणू हवेत पडतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या श्वास नलिकेतून आत जातो. तसेच हा विषाणू खुर्ची, टेबल, हात, नाक, तोंडात बसू शकतो. जर आपण कोणत्याही वस्तूला स्पर्श केला तर विषाणू तेथे उपस्थित होऊ शकतो. नॉनव्हेज आणि अंडी खाल्ल्याने हा विषाणू पसरत नाही. नॉनव्हेज आणि कोरोना विषाणूचा काहीही संबंध नाही. जर तुम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छा असेल तर आपण ते खाऊ शकता. फक्त एवढे लक्षात ठेवावे की ते चांगले शिजलेले असावे.

भारतात कोरोना विषाणूची 100 पेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून समोर येत आहेत. कोरोना विषाणूमुळे जिथे शाळा व महाविद्यालये बंद आहेत. तेथेच बर्‍याच संस्थांमधील कर्मचार्‍यांना वर्क फॉर्म होम देण्यात आले आहे.