लसीचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत, अगदी ठणठणीत; लसीकरणानंतर AIIMS च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितला अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  शनिवारपासून देशभरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदिप गुलेरिया १६ जानेवारीला काही मोजक्या लोकांसह लसीकरणात सहभागी झाले होते. कोरोना लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास वाढावा यासाठी डॉ, गुलेरिया यांनी स्वतःला लस टोचून घेतली. देशातील सगळ्यात मोठं रुग्णालय एम्समधील डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना लस घेतल्यानंतर आपला अनुभव सांगितला आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, की ”लसीकरणानंतर मला कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. मी सकाळापासून काम करत असून आता मिटींगसुद्धा घेत आहे. मी अगदी व्यवस्थित आहे. किरकोळ साईड इफेक्ट्स दिसल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. जर तुम्ही कोणतंही औषध घेत असाल तर काही प्रमाणात एलर्जीक रिएक्शन्स दिसू शकतात.”

लसीच्या साईड इफेक्ट्बाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ”जर तुम्ही कोणतीही औषधं घेत असाल तर सामान्य एलर्जिक रिएक्शन लसीकरणानंतर दिसू शकते. साधारपणे क्रोसिन, पॅरासिटामोल या औषधांमुळेही होऊ शकतात. लसीकरणामुळे कधीही हार्ट अटॅक येत नाही. सौम्य साईड इफेक्ट्स म्हणजेच शरीरातील वेदना, लस दिलेल्या ठिकाणी वेदना होणं, सौम्य साप अशी लक्षणं दिसू शकतात. १० टक्क्यापेक्षाही कमी लोकांमध्ये हे साईड इफेक्टस दिसून येतात. लसीकरणानंतर घाबरण्याचे काहीही कारण नाही. सर्व व्यवस्था केली आहे. साईड इफेक्टपासून सुटका मिळवण्यासाठी आरोग्यकेंद्र तयार करण्यात आली आहेत. लसीकरणासाठी सध्या कमी लोकांनी उत्साह दाखवला असला तरी हळूहळू लोकांचा सहभाग वाढू शकतो. लसीकरणाशी निगडीत मृत्यू झाल्याचे अजूनही समोर आलेले नाही.”

दरम्यान, डाॅ गुलेरिया यांनी सांगितले, की ”आम्ही लोकांना आवाहन केलं आहे की, कोविड संक्रमणातून बाहेर येणं, मृत्यूदर कमी करणं, अर्थव्यवस्था सुधारणं या गोष्टींचा विचार करता लसीकरणास प्राधान्य द्यायला हवं. देशातील शाळा सुरू करायच्या आहेत, आयुष्य सुरळीत करायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी लस टोचून घ्यायला हवी.”