पोलिसांना धक्का, आजारी पडल्यास वेतनकपात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रेल्वे पोलिसांना एक नवीन झटका बसला असून यापुढे आजारी असल्यास सुट्टी घेतल्यास त्यांचे वेतन कपात केले जाणार आहे. या नवीन निर्णयामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचा आदेश रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या नवीन निर्णयामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे.

नवीन आदेशानुसार आता पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना सुट्टीवरून आल्यानंतर आयुक्तालयात हजर राहून कामावर रुजू होण्यापूर्वी परवानगी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर गैरहजर असणाऱ्या सर्वांचे वेतन रोखण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आजारपणामुळे सुट्टीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या वेतनात मोठी कपात होणार असल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

रेल्वे स्थानकांवर घडणाऱ्या घटना हाताळणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे रेल्वे पोलिसांचे काम असते.अनेक पदे रिक्त असताना इतर पोलिसांवर त्याचा ताण येतो. त्यामुळे अनेकदा जास्त वेळ काम केल्याने कर्मचारी आजारी पडतात. आणि आजारपणामुळे त्यांना सुट्टी घ्यावी लागते. यामुळे रेल्वे पोलिसांवरील ताण वाढतो. मात्र रिक्त जागा भारण्याऐवजी पोलीस प्रशासन अशा प्रकारे निर्णय घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान यावर रेल्वे पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, कर्मचारी या सुट्ट्यांचा गैरवापर करत असून यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर याचा ताण येतो. त्यामुळे हे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रवींद्र सेनगावकर आयुक्त, मुंबई रेल्वे पोलिस

आरोग्यविषयक वृत्त –