अयोध्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या ‘मशिदी’मध्ये नमाज पठण करणं आणि देणगी देणं ‘हराम’: ओवेसी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी अयोध्येत बनणाऱ्या मशिदीसंदर्भात एक विधान केले आहे. ओवेसीने म्हटले आहे की जर कोणी अयोध्येत 5 एकर जागेवर बनत असलेल्या मशिदीत नमाज पठण केले तर ते ‘हराम’ मानले जाईल. अशा मशिदीत नमाज पठण करणे आणि देणगी देणे या दोन्ही गोष्टी हराम आहेत. ओवेसी अयोध्येत धन्नीपुरात बांधल्या गेलेल्या मशिदीच्या तत्त्वांच्या विरोधात आहेत.

ओवेसी यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करताना मशिद ट्रस्टच्या सचिवांनी या विधानाला राजकीय अजेंडाशी निगडित असल्याचे वर्णन केले आहे. वास्तविक, असदुद्दीन ओवेसी हे 26 जानेवारी रोजी कर्नाटकच्या बिदरमध्ये ‘सेव्ह कॉन्स्टिट्यूशन-सेव्ह इंडिया’ कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी मंचावरून सांगितले की जे लोक बाबरी मशिदीच्या बदल्यात 5 एकर जागेवर मशिद बांधत आहेत, प्रत्यक्षात ती ‘मशिद’ नसून ‘मस्जिद-ए-झिरार’ आहे. अशा मशिदीत नमाज पठण करणे हराम आहे.

भाजपावर निशाणा साधत एआयएमआयएम चे प्रमुख म्हणाले की, हे लोक मोदींच्या भक्तीत मग्न आहेत. सावरकर आणि गोडसे गांधींना घाबरत होते. आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला बळ दिले आहे. दिल्लीत बसणारा कोणी राजा नाही. ओवेसी यांनी नेताजींचा संदर्भ देत म्हटले की, ज्यांनी जय हिंदची घोषणा दिली ते हैदराबादमधील मुस्लिम होते.

दरम्यान नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला होता. त्याचवेळी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत पाच एकर जमीन मशिद बांधण्यासाठी देण्याचे आदेश दिले. यानंतर वक्फ बोर्डाला अयोध्याच्या धन्नीपुर गावात जमीन देण्यात आली होती, जिथे मशीद तयार केली जात आहे. या संदर्भात असदुद्दीन ओवेसी यांनी असे विधान केले आहे.