ओवेसींचा राज ठाकरेंवर पलटवार, आवेसी म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जातो अशा शब्दात वक्तव्य करत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. नुकताच राज ठाकरेंनी एक खुलासा केला होता ज्यात आवेसींचा त्यांनी उल्लेख केला होता. ओवेसींच्या मदतीने भाजपाचा देशात दंगली घडवण्याचा कट असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरेंनी केला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्याला आवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची  विक्रोळी येथे एक सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन ओवेसींच्या मदतीने देशात दंगली घडवण्याचा डाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मुख्य म्हणजे याबाबत माहिती देणारा फोन त्यांना दिल्लीवरून आला असल्याचाही त्यांनी दावा केला होता. यानंतर आता राज ठाकरे यांच्या आरोपांवर असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिले आहे.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतानाच आेवेसी म्हणाले की, “ओवेसी ही एखादी टॅबलेट असावी किंवा माझं नाव घेऊन त्यांच्या अंगात बळ येईल असे त्यांना वाटते. मनसेचे कार्यकर्ते उत्तर भारतीयांवर हल्ले करतात, राज ठाकरेंनी आधी स्वत:कडे पाहावं. राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर करायचा असेल तर करावा, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना सुनावले.