देशातील मुस्लिमांनी वारिस पठाणांना दाखवला ‘आरसा’, म्हणाले – ‘तुमच्या 15 कोटींमध्ये आम्ही नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरु आहेत. सीएए आणि एनआरसीविरोधात बोलताना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. देशातील राजकारण्यांपासून ते चित्रपट क्षेत्रापर्यंतच्या सर्वच जणांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. आता त्यांच्या विधानाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटायला लागले आहेत.

वारिस पठाण पागल आहे –
#WarisPathanPagalHai असा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर पठाण यांच्यावर देशातील मुस्लिमांनीच तिखट शब्दात टीका केली आहे. लक्षात ठेवा, तुमच्या 15 कोटींमध्ये आम्ही येत नाही. आम्ही सगळे भारतीय आहोत. आम्ही 15 कोटी नाही तर 130 कोटी आहोत. सगळे फक्त भारतीय आहोत. हिंदू-मुस्लिम भाई-भाई होते आणि भविष्यातही राहतील. तुमच्यासारखे आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुमचे मनसुबे काधीही यशस्वी होणार नाहीत, अशा शब्दांत त्यांच्यावर मुस्लिम नागरिकांनी टीका केली आहे.

काय म्हणाले होते वारिस पठाण ?
आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्ही देखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो तर काय होईल याचा विचार करा. आम्ही 15 कोटी आहोत. मात्र 100 कोटींवर भारी पडू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा, असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.