‘आम्ही 15 कोटी मुस्लिम 100 कोटींवर भारी’, MIM चे नेते वारिस पठाणांचं ‘वादग्रस्त’ वक्तव्य (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) देशभरात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. मुस्लिम महिलांच्या नेतृत्वात दिल्लीच्या शाहीन बागेत सीएएविरोधात झालेल्या निषेधाच्या संदर्भात त्यांनी म्हटले कि, ‘ते म्हणतात, आम्ही महिलांना पुढे केले आहे. परंतु हे लक्षात ठेवा की आतापर्यंत फक्त वाघिणीचं बाहेर आल्या आहेत आणि आपल्याला घाम फुटत आहे. यातून आपण समजू शकता की जर आम्ही सगळे बाहेर पडलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी पडू हे लक्षात ठेवा’.

वारिस पठाण यांचे वादग्रस्त विधान असलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात त्यांनी असेही म्हटले की, ‘आम्ही स्वातंत्र्यदेखील हिसकावून घेऊ’. वारीस पठाण हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. गुलबर्गा येथील सीएएविरोधी मोर्चाच्या वेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या त्या मेळाव्यात एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसीदेखील उपस्थित होते.

दरम्यान, वारिस पठाण यांनी यापूर्वीही अशी वादग्रस्त विधाने दिली आहेत. हिंदूंवर अप्रत्यक्ष हल्ला करत वारिस पठाण म्हणाले की, देशातील मुस्लिमांनी एकत्र येत स्वातंत्र्य मिळविण्याची वेळ आता आली आहे. सोबतच ते म्हणाले की, देशात मुस्लिमांची लोकसंख्या १५ कोटी आहे तरी ते अजूनही १०० कोटींपेक्षा जास्त हिंदूंवर अधिराज्य गाजवतात.

You might also like