बाळासाहेबांच्या 400 कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावाने रुग्णालय उभारा; ‘या’ खासदाराची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली. त्यानंतर आता एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंजूर झालेली ४०० कोटींची रक्कम रुग्णालय उभारण्यासाठी वापरावी आणि रुग्णालयाला त्यांचे नाव द्यावे असा सल्ला दिला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील
इम्तियाज जलील “बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी १०० कोटी खर्चून राज्यात ४ मोठी रुग्णालयं त्यांच्या नावानं सुरू करता येतील”, असे म्हणाले. रुग्णालयांना बाळासाहेबांचे नाव दिले तरी आमची काही हरकत नाही. कारण जनतेला सध्या स्मारकांची नव्हे, तर रुग्णालयांची गरज आहे, असेदेखील इम्तियाज जलील म्हणाले.