‘मोदीजी, तुम्ही कागदपत्र मागायला आला तर कब्रस्तानात घेऊन जाईन’

मुंबई : वृत्तसंस्था – देशात सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध होत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची या कायद्याविरोधात मुंबईत सभा झाली. यावेळी त्यांनी मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे. मी याच मातीत जन्माला आलो आणि याच मातीत दफन होईल, या शब्दात त्यांनी सीएएला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले. तसेच मोदीजी, ज्या दिवशी माझ्याकडे कागदपत्र मागायला याल, तेव्हा मी तुम्हाला माझे आजोबा, वडिलांना दफन करण्यात आलेल्या कब्रस्तानात घेऊन जाईल. तिथली माती तुम्हाला देईन आणि तुम्हाला सांगेन ही माझी कागदपत्र आहेत, असे जलील म्हणाले.

प्रत्येक शहरात शाहीन बाग
दिल्लीतल्या शाहीन बागेत सध्या मुस्लिम महिलांचे सीएए, एनआरसीविरोधात आंदोलन सुरु आहे. यावर बोलताना जलील म्हणाले, आमच्या घरातल्या बुरखाधारी महिला आज रस्त्यावर उतरल्याने तुम्हाला भीती वाटत आहे. जेव्हा हिजाब घातलेल्या महिला घराबाहेर पडतात, तेव्हा क्रांती घडते हा आमचा इतिहास आहे. आमच्या माता भगिनींनी प्रत्येक शहरात शाहीन बाग तयार केला आहे. त्यांचे समर्थ्य एकदा आजमावून पहा आणि जेव्हा घरातले इतर बाहेर पडतील, तेव्हा काय होईल याचा विचार करा, असा इशारा जलील यांनी दिला.

जलील यांचा अप्रत्यक्ष इशारा
मोदीजी आणि अमित शहाजी तुम्ही आमच्याकडे आमच्या प्रामाणिकपणाचे पुरावे मागता. तुम्ही आमची मशीद हिसकावून घेतली, त्यावेळी आम्ही नाराज झाले मात्र इतकं मोठं आंदोलन आम्ही केले नाही. तिहेरी तलाकच्या नावाखाली तुम्ही शरियतसोबत छेडछाड केली त्यावेळी देखील आम्ही एवढं मोठं आंदोलन केलं नाही. पण आता तुम्ही या दोशापासून आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलात तर असं वातावरण तुम्हाला देशात पहायला मिळेल, असे सांगत त्यांनी सीएएविरोधात तीव्र आंदोलन सुरु राहील असा अप्रत्यक्ष इशारा दिला.

फेसबुक पेज लाईक करा