ज्या-ज्या ठिकाणी अमित शहा, योगी आदित्यनाथ गेले, तिथं भाजपाचा पराभव, ओवैसींचा घणाघात

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर एआयएमआयएम (AIMIM) नेते खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी एक पत्रकार परिषद घेऊन भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जेथे-जेथे अमित शाह, योगी आदित्यनाथ गेले, तेथे भाजपचा पराभव झाला आहे. आम्ही भाजपशी लोकशाहीच्या मार्गाने लढू. तेलंगणाचे लोक भाजपला राज्यात विस्तार करण्यापासून रोखतील, असा आपल्याला विश्वास असल्याचेदेखील ओवेसी यांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला बहुमतापासून वंचित राहावे लागले असले तरीही एमआयएमच्या पाठिंब्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही चारवरून 48 जागांपर्यंत झेप मारली आहे, तर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (AIMIM) ला 44 जागांवर यश मिळाले आहे.

भाजपचे हे यश एकवेळचे, तेलंगणा विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही आम्ही हैदराबाद महापालिकेच्या 44 जागा जिंकलेल्या आहेत. आपण सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी बोललो असून, त्यांना शनिवारी आपले काम सुरू करण्यास सांगितले आहे. भाजपला मिळालेले यश हे फक्त एकावेळेचे यश आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हे यश मिळणार नाही. आम्ही या निवडणुकीत श्रम घेतले होते. तरीदेखील हैदराबादच्या जनतेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. महापालिकेची निवडणूक आहे, थोडे वर-खाली होत असते. हैदराबादची जनता आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद.

भाजपवर डेमॉक्रॅटिक स्ट्राइक झाला
असदुद्दीन ओवेसी यांनी ज्या ठिकाणी योगी आदित्यनाथ आले होते, तेथे काय झाले? ते सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलले होते. आता भाजपवर डेमॉक्रॅटिक स्ट्राइक झाला आहे. आकडे सर्वांच्या समोर आहेत. मी मुख्यमंत्री योगींना सांगेन की तुम्ही मुंबईला गेला होतात. तुम्ही अभिनय नका करू. वास्तवाच्या जगात या. लोकांवर जे अत्याचार केले ते संपवा. राज्यघटनेच्या विरोधात जात लव्ह जिहाद कायदा बनवत आहात. तो रोखा असेदेखील त्यांनी म्हटले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

हैदराबादमध्ये TRS सर्वांत मोठा पक्ष
महापालिका निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, सत्तेची चावी एमआयएमच्या हाती आहे. दरम्यान, महापालिकेच्या 150 जागांसाठी 46.6 टक्के मतदान झाले होते. भाजपने ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची केली होती. गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार केला. योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे भाग्यनगर करण्याचे विधान करून मतदारांना साद घातली हाेती, तर अमित शाह यांनी जंगी रोड शो करून हैदराबादमधील निझामशाही संपवाची आहे, असे वक्तव्य करून ओवेसी आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली होती.