हैदराबाद महापालिका निवडणूक : सत्ताधारी TRS बहुमतांपासून वंचित, AIMIM ची पीछेहाट; ओवेसी म्हणतात…

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन – येथील महापालिकेची निवडणूक असली तरी ती सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. महापालिकेच्या 150 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पहिल्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. हैदराबादचे भाग्यनगर करण्याच्या इराद्याने निवडणूक लढविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून वंचित राहावे लागले तरीही निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पाेरेशनच्या निवडणुकांमध्ये 44 जागांवर विजय मिळवला आहे. मी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली असून, त्यांना काम सुरू करण्यासही सांगितले असल्याचे ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष टीआरएसवरही भाष्य केले. टीआरएसला निकालांची समीक्षा करण्याची गरज आहे. तेलंगणमधील टीआरएस ही एक चांगला दर्जा असलेला राजकीय पक्ष आहे. ते तेलंगणमधील क्षेत्रीय भावनांचे प्रतिनिधित्व करतात. के.चंद्रशेखर राव नक्कीच या पक्षाच्या कामगिरीची समीक्षा करतील, असा विश्वास असल्याचे ओवेसी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले आहे. आम्ही भाजपशी लोकशाही पद्धतीनं लढू. तेलंगणमधील नागरिक भाजपला त्यांच्या विचारधारेचा विस्तार करण्यापासून रोखतील, असा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

भाजपने 46 जागा पटकावून या निवडणुकीत लक्षणीय कामगिरी केली आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील टीआरएस या प्रादेशिक पक्षाला भाजपने आपला पर्याय निर्माण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी म्हटले आहे. हा भाजपचा ‘सॅफ्रॉन स्ट्राइक’ असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्याचे टीआरएसने मान्य केले आहे. मात्र, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव म्हणाले की, निकालामुळे नाराज होण्याचे काहीच कारण नाही. टीआरएसला सर्वांत मोठा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.