राफेल भारतात कधी दाखल होणार ? हवाई दलाच्या प्रमुखांनी दिली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेल करारावरून गेल्या काही दिवसात देशभरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. राफेलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आता राफेल भारतात कधी येणार याबाबतची माहिती भारताच्या हवाई दलाचे प्रमुख बिरेंदर सिंह धानोआ यांनी दिली आहे.

‘राफेल ही लढाऊ विमानं साधारणपणे याच वर्षी सप्टेंबरपर्यंत दाखल होतील,’ असं बिरेंदर सिंह धानोआ यांनी काही वेळापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे मोठ्या वादानंतर राफेल विमानं भारतात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किती अतिरेकी मारले हे मोजणे आमचे काम नाही – दरम्यान याच पत्रकार परिषदेत धानोआ यांनी भारताने केलेल्या एअर स्ट्राईक-२ मध्ये किती अतिरेकी मारले गेले ? या आकड्यावरून स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी बोलताना भारतीय वायुदलाचे चीफ एअर मार्शल बी.एस. धनोया यांनी सांगितले आहे की ” भारतीय वायुसेना मृतांची संख्या सांगण्याचे काम करीत नाही. ते सरकारचे काम आहे. आम्ही हे मोजतो की , आम्ही आमचे लक्ष्य भेदले आहे की नाही “. एअर स्ट्राईक-२ मधील ३५० अतिरेकींच्या मृतांच्या आकड्यावरून भारतीय वायुसेनेने स्पष्टीकरण दिले आहे.

आमचे सरकार राफेल उडवणार : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर त्यांच्याच बालेकिल्ल्यातून जोरदार निशाणा साधला. आमचे सरकारच पहिले राफेल विमान उडवणार, असंही मोदी अमेठीत म्हणाले. राफेल विमान प्रकरणावरुन काँग्रेसला टार्गेट करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, ही लोक वर्षानुवर्षे राफेल विमानांच्या खरेदी करारावरच अडून बसले होते. जेव्हा सरकार सत्तेतून जाण्याची वेळ आली तेव्हा संबंधित करार बासनात गुंडाळला. मग आमचे सरकार आहे आणि दीड वर्षाच्या आतच करारावर स्वाक्षरी करण्यात आली . आणि काही महिन्यांतच देशाच्या शत्रूंना धक्के देण्यासाठी पहिले राफेल विमान आकाशात झेपावणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.