पुणेकरांच्या सेवेत वातानुकूलित ई-बसेस रुजू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत २५ ई-बस आणि १० तेजस्विनी बेसेस मिळाल्या आहेत. या बसेसचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सणस मैदानावर लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुक्ता टिळक, राज्यमंत्र दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, मेघा कुलकर्णी, योगेश टिळेकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर या बसेस आज पासून मार्गावर धावणार आहेत. वातानुकुलीत बसेसच्या प्रतिक्षेत पुणेकर होते. आज पुणेकरांच्या या वातानुकुलीत बसेस रुजू झाल्या आहेत. या बसेसचे तिकीट दर इतर बसेस प्रमाणेच असून कमी पैशात आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सात मार्गावर या बसेस चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यातील २५ बसेसचे लोकार्पण आज करण्यात आले असून आणखी ५०० बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. या बसेस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत.

या बसेसमध्ये सर्व प्रकारचे पासेस चालणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होणार आहे. या बससाठी निगडी व भेकराईनगर येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. एकूण सात मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याचील चार मार्ग पुण्यातील तर तीन मार्ग पिंपरी-चिंचवडमध्ये असणार आहेत.

या मार्गावर धावणार बसेस
निगडी ते भोसरी, डांगे चौक ते हिंजवडी माण फेज -३, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा, हडपसर ते पिंपळे गुरव, भेकराईनगर ते पुणे स्टेशन, भेकराईनगर ते न.ता.वाडी, हडपसर ते हिंजवडी माण फेज -३

ई – बस विषयी थोडक्यात
आज पासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झालेल्या ई-बसेसची आसन क्षमता ३१ आहे. या बसेसमध्ये प्रवाशांना आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी मोबाईल चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. या व्यतिरीक्त पॅनिक बटन, सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. ही बस एका युनिटमध्ये तीन किलोमीटर अंतर धावणार आहे. या बसेसमुळे प्रदुषण कमी होणार आहे.