Air India ने UK ला जाणारी अन् येणारी विमानसेवा केली रद्द, 24 ते 30 एप्रिलदरम्यान राहणार बंद

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर काही देशांनी भारतातून येणाऱ्या किंवा भारतात जाणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियाने ब्रिटनला जाणाऱ्या आणि ब्रिटनहून येणाऱ्या आपल्या सर्व फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. 24 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान ही सेवा बंद राहणार असल्याची माहिती बुधवारी (दि. 21) एअर इंडियाने आपल्या ट्विटर अकांटवरून दिली आहे.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि ब्रिटन यादरम्यान प्रवास करणार असलेल्या प्रवाशांनी नोंद घ्यावी की यूकेकडून नुकत्याच जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर UK ला जाणाऱ्या किंवा UK हून येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाईट्स 24 ते 30 एप्रिल यादरम्यान रद्द केल्या आहेत. तिकिटांच्या परताव्यासंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान 24 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत दिल्ली आणि मुंबईहून यूकेला जाणारी एक फ्लाईट आठवड्यातून एकदा पाठवण्याचा विचार सुरू असून त्यासंदर्भात लवकरच कळवले जाईल, असेही एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. दरम्यान देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार 41 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2033 जणांचा मृत्यू झाला आहे.